रजेसाठी भावाचे पार्थिव नेले थेट कार्यालयात, एसटी चालकाची व्यथा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2019 02:01 AM2019-05-15T02:01:19+5:302019-05-15T02:01:24+5:30
उपचार सुरू असलेल्या भावाचा मंगळवारी पहाटे मृत्यू झाल्यानंतर त्याच्या अंत्यसंस्कारासाठी रजा मंजूर न झाल्याने एसटी चालकाने थेट भावाचे पार्थिव सकाळी रुग्णवाहिकेतच थेट सिडको बस स्थानकात आणले.
औरंगाबाद : उपचार सुरू असलेल्या भावाचा मंगळवारी पहाटे मृत्यू झाल्यानंतर त्याच्या अंत्यसंस्कारासाठी रजा मंजूर न झाल्याने एसटी चालकाने थेट भावाचे पार्थिव सकाळी रुग्णवाहिकेतच थेट सिडको बस स्थानकात आणले.
सिडको बस स्थानकातील चालक तेजराव सोनवणे (रा. लोणी, रिसोड) यांच्या भावाची प्रकृती बिघडल्याने त्यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सोमवारी रात्री तेजराव सोनवणे हे कर्तव्यावरून आले. सिडको बसस्थानकातून ते थेट घाटी रुग्णालयात गेले. उपचार सुरूअसताना भावाची प्रकृती गंभीर असल्याने तेजराव यांनी आधीच संबंधित अधिकाऱ्यांना मंगळवारी रजा देण्याची विनंती केली होती.
घाटी रुग्णालयात मंगळवारी पहाटे ३.३० वाजेच्या सुमारास तेजराव यांच्या भावाचे निधन झाले. त्यानंतर सकाळी ७ वाजता त्यांनी आगारातील संबंधित अधिकाऱ्यांना माहिती दिली. तेव्हा ‘तुमचे रोज कोणीतरी मरत असतात’, असे सुनावले. तेव्हा गावी जाण्यापूर्वी त्यांनी घाटी रुग्णालयातून थेट सिडको बस स्थानकात रुग्णवाहिकेतच भावाचे पार्थिव आणले आणि रजेचा अर्ज मंजूर करून घेतला, असे प्रत्यक्षदर्शींनी
सांगितले.
‘अडवणूक केलेली नाही’
रुग्णालयात जाण्यापूर्वी संबंधित चालकाने रजेचा अर्ज सादर केला होता. त्यासाठी कोणतीही अडवणूक करण्यात आलेली नाही. भावाचे पार्थिव गावाला घेऊन जाण्यापूर्वी विश्रामगृहात ठेवलेले सामान घेण्यासाठी चालकाने रुग्णवाहिका बस स्थानकात आणली होती.
- अमोल भुसारी, आगार व्यवस्थापक, सिडको