साकेतनगरला खड्डे, चिखलाने अवकळा; वाहनांचे नुकसान, रस्त्यावरून चालणे कठीण
By साहेबराव हिवराळे | Published: October 6, 2023 06:58 PM2023-10-06T18:58:32+5:302023-10-06T19:00:17+5:30
एक दिवस एक वसाहत; वाहनांसाठी गल्ली बनली धोकादायक
छत्रपती संभाजीनगर : भावसिंगपुरा परिसरातील साकेतनगर (पेठेनगर) ही वसाहत तशी उच्चभ्रू म्हणून ओळखली जाते. येथील उच्चशिक्षित व उच्चपदस्थ नागरिक मनपाचा कर सातत्याने अदा करतात. परंतु महानगरपालिकेने येथील मूलभूत प्रश्नांकडे सातत्याने कानाडोळा केला. त्यामुळे चिखल व खड्डे चुकविताना होणारी घसरगुंडी सहन करीतच नागरिकांना घर गाठावे लागते. कधी मोठ्या अपघातास निमंत्रण दिले जाईल, हे सांगता येत नाही, अशी भीती येथील रहिवासी व्यक्त करतात. जलवाहिनीच्या कामासाठी खोदलेले खड्डे महिनोनमहिने न बुजविल्यामुळे चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. याकडे स्मार्ट मनपाचे लक्ष जाण्याची नागरिकांना प्रतीक्षा आहे.
शहर बसला वावडे...
नोकरी तसेच शिक्षणासाठी शहरात ये-जा करणाऱ्यांना खासगी वाहनांशिवाय पेठेनगर, भीमनगर, भावसिंगपुरा व इतर वसाहतीत जाणे शक्य नाही. शहर बसला या परिसराचे वावडे आहे. औरंगपुरा व इतर भागांतून शहर बस सुरू कराव्यात.
- यशवंत कांबळे (प्रतिक्रिया)
एकच जलकुंभ, दुसरा कधी?
परिसरासाठी दोन जलकुुंभ मंजूर असताना एकाच जलकुंभाचे काम सुरू आहे. ठेकेदाराने खोदलेले रस्ते व्यवस्थित बुजविलेले नाहीत. त्याचा नागरिकांना मोठा मनस्ताप होत आहे. वाहनांचे नुकसान होत आहे. रस्त्यावरून चालणे कठीण आहे.
- माजी नगरसेवक कृष्णा बनकर
डीपी रोड होणार कधी?
पडेगाव ते हर्सूल डीपी रोड तयार झाल्यास विविध वसाहतींना अगदी सोयीचे होईल; परंतु त्या रस्त्याचे काम रखडलेले असल्याने छावणीपासून नंदनवन कॉलनीतून एकमेव रस्त्यावरूनच पेठेनगर गाठावे लागते.
उद्यान विकसित करावे
परिसरात उद्यानासाठी सोडण्यात आलेल्या मोकळ्या जागेवर उद्यान विकसित करण्याची आवश्यकता आहे. संरक्षण कुंपण मारून बाग विकसित करावी. त्यामुळे परिसराची शान वाढेल व अतिक्रमणही होणार नाही.
- सुभाष साबळे
नळाला कमी दाबाने पाणी
जलवाहिनीचे पाणी वाया जात असल्याने नळाला कमी दाबाने पाणी येते. त्यासाठी मनपाच्या अधिकाऱ्यांनी तुटलेले नळ कनेक्शन जोडणी करून देण्याची गरज आहे.
- धनराज गोंडाणे
मनपाचे दुर्लक्ष
मागासवर्गीयांची उच्चभ्रू वसाहत असलेले साकेतनगरात (पेठेनगर) मोठ्या संख्येने शिक्षक, प्राध्यापक, अभियंते, डॉक्टरांसह प्रशासनातील उच्चपदस्थ या वसाहतीत राहतात. आदर्शांचा भरणा असलेल्या वसाहतीकडे योग्य नेतृत्वाअभावी मनपा मात्र दुर्लक्ष करते आहे.