सख्खा भाऊ वैरी ! पैशाच्या वादातून लहान भावाची चाकूने भोसकून हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 04:57 PM2020-07-24T16:57:05+5:302020-07-24T16:58:45+5:30
खून करून पळालेल्या मोठ्या भावास पोलिसांनी पैठण येथून ताब्यात घेतले
औरंगाबाद : पैशाच्या वादातून मोठ्या भावाने वकिल असलेल्या लहान भावाची चाकूने सपासप वार करून आणि भोसकून निर्घृण हत्या केली . ही खळबळजनक घटना गारखेडा रिलायन्स मॉल समोरील अशोकनगरातील परितोष विहार या अपार्टमेंटमध्ये शुक्रवारी (दि २४ ) सकाळी ९ :२० वाजेच्या सुमारास घडली.
सूर्यप्रकाश रामनाथ ठाकूर (वय ५४ ) असे खून झालेल्या वकिलाचे नाव आहे. या घटनेनंतर पळून गेलेला खूनी भाऊ वेदप्रकाश रामनाथ ठाकूर (५७ रा. पैठण ) याला जवाहरनगर पोलिसांनी पैठण येथे ताब्यात घेतले. प्राप्त माहिती अशी की, मयत सूर्यप्रकाश ठाकूर हे रिलायन्स मॉलसमोरील परितोष अपार्टमेंटच्या दुसऱ्या मजल्यावर फ्लॅटमध्ये पत्नी आशा यांच्यासह राहात होते. सूर्यप्रकाश हे चिकलठाणा औद्योगिक वसाहतीमधील पॅरासन कंपनीत विधी सल्लागार म्हणून १३ वर्षापासून कार्यरत होते. तर त्यांची पत्नी खाजगी रुग्णालयात नर्स आहे.
आज सकाळी ते सूर्यप्रकाश हे बॅग घेऊन कामावर जाण्याच्या तयारीत असताना त्यांचा मोठा भाऊ आरोपी वेदप्रकाश त्यांच्या घरी आला. यावेळी त्याने घर बांधकाम करण्यासाठी सूर्यप्रकाश यांच्याकडे २ लाख रुपयांची मागणी केली. दोन भावामध्ये पैशावरुन बोलणी सुरू असताना आशा चहासाठी दूध आणण्यासाठी वरच्या मजल्यावरील संहिता जोशी यांच्या घरी गेल्या. त्याचवेळी आरोपीने सूर्यप्रकाश यांच्या छाती, पोट, मान, हात, दंडावर धारदार शस्त्राने सपासप वार केले. यानंतर त्यांना रक्ताच्या थारोळ्यात सोडून आरोपी शस्त्रासह घटनास्थळावरुन दुचाकीने पसार झाला. या घटनेची माहिती जवाहरनगर पोलिसांना कळविण्यात आली. पोलीस निरीक्षक संतोष पाटिल, पोलीस उपनिरिक्षक भरत पाचोळे, कर्मचारी समाधान काळे, दंडवते यांनी घटनास्थळी धाव घेतली .
अवघ्या ४ ते ५ मिनिटात हत्या
आशा वरच्या मजल्यावर जाऊन ४ ते ५ मिनिटे होत असताना धूणी भांडी करणाऱ्या विमलबाई यांना पहिल्या मजल्यावरून रक्ताने माखलेल्या हातासह एक व्यक्ती घाईघाईने जिना उतरून जात असल्याचे दिसले. त्यानंतर विमलबाई यांनी सूर्यप्रकाश यांचे दाराची बाहेरुन लावलेली कडी उघडताच त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेले सूर्यप्रकाश दिसले. यावेळी तिने आरडाओरड करीत वरच्या मजल्यावर गेलेल्या आशा यांना बोलावले. यानंतर शेजाऱ्यांनी सूर्यप्रकाश यांना रिक्षातून एम जी एम रुग्णालयात नेले . मात्र तोपर्यंत उशीर झाला होता . तेथील डॉक्टरांनी सूर्यप्रकाश यांना तपासून त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.