‘सखा’चा मारेकरी ‘सुखदेव’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2018 12:50 AM2018-08-15T00:50:48+5:302018-08-15T00:50:59+5:30
सख्ख्या भावाचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह पटरीजवळ फेकून दिल्याची घटना रविवारी रात्री घडली; परंतु मृताच्या खिशातील आधार कार्डावरून माग काढत आरोपीच्या मुसक्या मुकुंदवाडी पोलिसांनी आवळल्या
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : सख्ख्या भावाचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह पटरीजवळ फेकून दिल्याची घटना रविवारी रात्री घडली; परंतु मृताच्या खिशातील आधार कार्डावरून माग काढत आरोपीच्या मुसक्या मुकुंदवाडी पोलिसांनी आवळल्या. संपत्तीच्या वादातून सुखदेवने त्याचा लहान भाऊ सखारामचा काटा काढल्याची खळबळजनक घटना पोलीस तपासातून समोर आली.
सखाराम उत्तम सतुके (३२, रा. राधास्वामी कॉलनी, जटवाडा), असे मृताचे नाव असून, मारेकरी सुखदेव उत्तम सतुके (४०, रा. जयभवानीनगर) आहे. सखाराम दारूचा व्यसनी होता. त्याने गावाकडील एक एकर जमिनीतील एक तुकडा विकून पैसे दारूमध्ये उडविले होते. सुखदेव त्यास सतत पैशाची मागणी करीत होता. सखाराम सतुकेचे पत्नीसोबत पटत नसल्याने तो तिच्यापासून वेगळा राहत होता. दारू पिऊन तो भावाशी भांडत होता. रविवारी रात्री तो दारू पिऊन घरी आला आणि त्याने सुखदेवला मारहाण करीत त्याचा गळा पकडला. दोघांत हाणामारी सुरू झाली. सुखदेवने जोराचा धक्का दिल्याने सखाराम खाली पडला. तेवढ्यात सुखदेवने दगड उचलून त्याच्या डोक्यात घातला व सखाराम गप्पगार झाला. काही वेळाने त्याने मृतदेह ओढत नेऊन पटरीजवळ टाकला. तो मृतदेह त्याला पटरीवरच टाकायचा होता; परंतु पटरी जमिनीपासून उंच असल्याने त्याला ते शक्य झाले नाही.
जयभवानीनगर येथे संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आल्याने मुकुंदवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नाथा जाधव व पथकाला संशय आला. तो रेल्वे अपघातात नसून, काही तरी घातपात असल्याचे निदर्शनास आल्याने सहायक पोलीस आयुक्त गायकवाड यांनीदेखील घटनास्थळी भेट देऊन फौजदार बनसोड, सहायक फौजदार शेख हारुण, कौतिक गोरे, पोकॉ. प्रकाश सोनवणे, विजय चौधरी, कैलास काकड, शेख असलम, सोमकांत, भालेराव, सुनील पवार, लक्ष्मण राठोड यांना कामाला लावले.
मृताच्या खिशात आढळलेल्या कागदपत्रांवरून पोलिसांनी नातेवाईकांशी संपर्क साधला. मृताची पत्नी शकुंतलाबाईने घाटीत मृतदेह पाहून तो पतीचा असल्याचे सांगितले. तसेच तीन-चार दिवसांपासून ते भावाकडे जयभवानीनगर येथे गेले होते, अशी माहिती दिली. पोलिसांनी सुखदेवला फोन लावला असता फोन बंद असल्याचे समजले. त्यानंतर जयभवानीनगरात पोलीस पथकाने सुखदेवला ताब्यात घेतले. त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या घरी पाहणी केली.
घरासमोरील रक्ताचे डाग आणि रक्ताने माखलेले दगड पाहून त्याने स्वत:हूनच खुनाची कहाणी सांगून, ‘साहेब, मला माफ करा, तो दारूच्या नशेत मारहाण करून गळा दाबून मला मारण्याच्या तयारीत होता. हाणामारीत त्याला दगडाने मारले अन् त्याचा मृत्यू झाला,’ अशी कबुली त्याने दिली.
मृत सखारामला दोन बायका आहेत. एका बायकोचे प्रकरण न्यायालयातअसल्याचे सांगण्यात आले, तर दुसऱ्या बायकोसोबतही त्याचे पटत नसल्याने तो असाच पाहुण्यांकडे एक-दोन दिवस राहत होता. सुखदेवचा जयभवानीनगरात छोटासा भूखंड असून, त्यावर पत्र्याचे घर करून तो राहतो. बायको, मुले कन्नड तालुक्यातील तांबी दहेगाव येथे राहतात. आठवडाभर मिळालेल्या मजुरीतून तो गावाकडे जाऊन राहत होता, पुन्हा शहरात येऊन मजुरी करीत होता.