यंदाच्या कोजागरीला ‘ग्रहण’ आहे साक्षीला! मसाला दूध पिणाऱ्यांचा होणार मूड ऑफ
By प्रशांत तेलवाडकर | Published: October 6, 2023 05:48 AM2023-10-06T05:48:07+5:302023-10-06T05:48:31+5:30
‘चंद्र आहे साक्षीला’ हे गाणे प्रत्येकाने ऐकले असेल; पण, ‘कोजागिरीला ग्रहण आहे साक्षीला’ असे म्हटले तर थोडे वावगे वाटेल.
प्रशांत तेलवाडकर
छत्रपती संभाजीनगर : ‘चंद्र आहे साक्षीला’ हे गाणे प्रत्येकाने ऐकले असेल; पण, ‘कोजागिरीला ग्रहण आहे साक्षीला’ असे म्हटले तर थोडे वावगे वाटेल. कारण तब्बल ९ वर्षांनंतर २८ ऑक्टोबरला अशा खगोलीय घटनेची सर्वांना अनुभूती येणार आहे. त्या दिवशी कोजागरी पौर्णिमेला खंडग्रास चंद्रग्रहण आहे. यामुळे मसाला दूध पिणाऱ्यांचा मूड ऑफ होईल हे नक्की.
कोजागरीची पूजा कधी करावी?
वेधकाळात प्रतिवर्षाप्रमाणे रात्रीच्या वेळी लक्ष्मी व इंद्राचे पूजन करून मसाला दुधाचा नैवेद्य दाखविता येईल. मात्र, प्रसाद म्हणून केवळ एक चमचाभर दूध प्यावे व राहिलेले दूध दुसऱ्या दिवशी घेता येईल.
- सुरेश केदारे गुरुजी, वेदमूर्ती
८ वर्षांनंतर कोजागरीला चंद्रग्रहण
यापूर्वी ८ ऑक्टोबर २०१४ या दिवशी कोजागरी पौर्णिमेला चंद्रग्रहण होते. आता थेट ३० ऑक्टोबर २०३१ या दिवशी कोजागरीला चंद्रग्रहण पाहण्यास मिळेल.
- श्रीनिवास औंधकर, खगोलशास्त्र अभ्यासक
काय म्हणतात ज्योतिष, खगोलशास्त्र अभ्यासक?
ज्योतिष
चंद्रग्रहण काळात मसाला दूध पिऊ नये.
मेष, वृषभ, कन्या, मकर राशीने ग्रहण पाहू नये.
चंद्रग्रहण काळ हा अशुभ असतो.
खगोलशास्त्र
दूध पिण्यास काहीच हरकत नाही.
राशी कोणतीही असो, सर्वांनी चंद्रग्रहण पाहावे.
ही खगोलीय घटना आहे, शुभ-अशुभ असे काही नसते.
खंडग्रास चंद्रग्रहण कसे असते?
चंद्र व सूर्य यामध्ये सरळ रेषेत पृथ्वी येते व पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. चंद्राचा फक्त काही भागच पृथ्वीच्या सावलीखाली आला तर खंडग्रास चंद्रग्रहणाची स्थिती निर्माण होते.