साक्षी मलिक, फोगट बहिणींमुळे महिला कुस्तीला मिळाली चालना - काका पवार  

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2017 10:34 PM2017-09-18T22:34:22+5:302017-09-18T22:35:18+5:30

रिओ आॅलिम्पिकमध्ये कास्यपदक जिंकणारी साक्षी मलिक आणि फोगट बहिणींमुळे महिला कुस्तीला चालना मिळत असल्याचे मत अर्जुन पुरस्कारप्राप्त काका पवार यांनी  लोकमत शी बोलताना व्यक्त केले. नरसिंग यादव, सुशीलकुमार आणि राहुल आवारे यांच्याकडून २0२0 च्या आॅलिम्पिकमध्ये देशाला पदकांच्या आशा असल्याचेही त्यांनी सांगितले.

 Sakshi Malik and fogat sisters brought women wrestling - Kaka Pawar | साक्षी मलिक, फोगट बहिणींमुळे महिला कुस्तीला मिळाली चालना - काका पवार  

साक्षी मलिक, फोगट बहिणींमुळे महिला कुस्तीला मिळाली चालना - काका पवार  

googlenewsNext

औरंगाबाद, दि. 18 -  रिओ आॅलिम्पिकमध्ये कास्यपदक जिंकणारी साक्षी मलिक आणि फोगट बहिणींमुळे महिला कुस्तीला चालना मिळत असल्याचे मत अर्जुन पुरस्कारप्राप्त काका पवार यांनी  लोकमतशी बोलताना व्यक्त केले. नरसिंग यादव, सुशीलकुमार आणि राहुल आवारे यांच्याकडून २0२0 च्या आॅलिम्पिकमध्ये देशाला पदकांच्या आशा असल्याचेही त्यांनी सांगितले.
मराठवाड्यातील पहिले अर्जुन पुरस्कारप्राप्त आणि अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशासाठी पदके जिंकणारे शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त काका पवार यांचे औरंगाबादेत सोमवारी आगमन झाले होते. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत साईच्या पश्चिम विभागीय केंद्रात टपाल खात्याच्या अखिल भारतीय कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन झाले. या प्रसंगी त्यांनी लोकमतशी मनमोकळी चर्चा करीत आपले मत व्यक्त केले.
 दंगल  आणि  सुलतान  या चित्रपटामुळे देशात घरा-घरात कुस्ती पोहोचली. त्याचा चांगला परिणाम या खेळावर होत आहे. रिओ आॅलिम्पिकमध्ये साक्षी मलिकने ऐतिहासिक कामगिरी करताना भारतासाठी कास्यपदक जिंकणारी पहिली महिला पहिलवान ठरवण्याचा मान मिळवला. साक्षी आणि फोगट बहिणी गीता, विनिश आणि बिबता कुमारी यांच्या पदकविजेत्या कामगिरीमुळे महिला कुस्तीला चांगले दिवस आले आहेत. त्यांच्यामुळेच महिला कुस्तीला चालना मिळत आहे. या कामगिरीमुळेच महिला कुस्तीविषयी पालकांतही जागृती निर्माण झाली आहेत आणि पदक जिंकेल अशी आशा उंचावल्याने पालकही मुलींना कुस्ती खेळण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत. पश्चिम महाराष्ट्रात पुणे, कोल्हापूर आणि विदर्भातही महिलांचे आखाडे रंगत आहेत, असे काका पवार यांनी सांगितले.
रिओ आॅलिम्पिकमध्ये भारताला सुशील कुमार आणि नरसिंग यादव पदक जिंकून देऊ शकले असते; परंतु या दोघांच्या वादामुळे भारताला आॅलिम्पिकमध्ये पदकापासून वंचित राहावे लागल्याची खंतही काका पवार यांनी व्यक्त केली. मराठवाड्यातील कुस्तीची स्थिती बिकट आहे. येथील मल्लांमध्ये प्रचंड गुणवत्ता आहे; परंतु त्यांना कोणाचे पाठबळ नाही. तसेच त्यांच्या गुणवत्तेला घडवणारे प्रशिक्षकच राहिले नाहीत. कुस्ती जिवंत ठेवण्यासाठी शासनाने दर्जेदार वस्तादांना मानधन देणे आवश्यक आहे. शालेय स्तरावरदेखील कुस्ती वाढली पाहिजे; परंतु शाळेत मल्लविद्या शिकवणाराच नसेल तर पहिलवान कसे घडतील, असा प्रश्न उपस्थित करताना काका पवार यांनी कुस्ती लीगमुळे पहिलवांनाना फायदा होत असल्याचे सांगितले. कुस्ती लीगमध्ये पहिलवानाला ४० लाख रुपये मिळतात. त्याद्वारे मल्ल स्वत:चा पोषक आहार घेऊ शकतो तसेच परदेशातही प्रशिक्षणाही जाऊ शकतो, असे सांगत काका पवार यांनी कुस्ती लीगचे समर्थन केले.
शासनातर्फे कुस्त्यांच्या मॅट उपलब्ध करून देण्याच्या उपक्रमाची काका पवार यांनी प्रशंसा केली आणि देशाकडून खेळण्याचे स्वप्न बाळगणा-यांनी मॅटवरच खेळले पाहिजे, असा सल्लाही काका पवार यांनी उदयोन्मुख मल्लांना दिला.

राहुल आॅलिम्पिकमध्ये खेळण्याचे स्वप्न
मराठवाड्याचा आंतरराष्ट्रीय पहिलवान राहुल आवारे याचे गुरू हरिश्चंद्र बिराजदार आणि काका पवार हे आहेत. राहुल आॅलिम्पिकमध्ये खेळावे हे आपले स्वप्न आहे. त्याच्याकडून २०२० मध्ये होणा-या आॅलिम्पिकसाठी तयारी करून घेण्यात येत आहे. सध्या तो आशियाई आणि राष्ट्रकुल स्पर्धेसाठी कसून सराव करीत आहेत. राहुलसह उत्कर्ष काळे, विक्रम कु-हाडे या आंतरराष्ट्रीय पदकविजेत्यांकडूनही भविष्यात आपल्याला अपेक्षा असल्याचे काका पवार यांनी सांगितले.

महाराष्ट्राच्या गुंडाजी पाटील यांची गोल्डन कामगिरी
अ. भा. कुस्ती स्पर्धा : ज्ञानेश्वर, शिवराज, चंद्रशेखर, पांडुरंग यांना रौप्य
औरंगाबाद : साईच्या पश्चिम विभागीय केंद्रावर सोमवारपासून सुरु झालेल्या टपाल खात्याच्या अखिल भारती कुस्ती स्पर्धेत गुंडाजी पाटील यांनी महाराष्ट्राला पहिले सुवर्णपदक जिंकून दिले. त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या ज्ञानेश्वर भोगे, शिवाजी पाटील, चंद्रशेखर शिंदे, पांडुरंग पवार यांनी रौप्य तर संतोष निंबाळकर, अमोल कोंढालकर यांनी कास्पदकांची कमाई केली.
निकाल ग्रीको रोमन (५९ किलो) : १. तुलसीराम एम. (ओडिशा), २. ज्ञानेश्वर भोगे (महाराष्ट्र), ३. ओंकार सिंग (राजस्थान), एस. सोलंकी (गुजरात).
६६ किलो : १. संजय कुमार रे (उत्तर प्रदेश), २. शिवाजी पाटील (महाराष्ट्र), ३. शिवराम मीना (दिल्ली), राम एन. (राजस्थान). ७१ किलो : १. विजय खत्री (दिल्ली), २. चांदमल बिष्णोई (राजस्थान), ३. संतोष निंबाळकर (महाराष्ट्र), शाम सुंदर (ओडिशा).
७५ किलो : १. कालू दास (हरियाणा), २. राज सिंग (राजस्थान), ३. अमोल कोंढाळकर (महाराष्ट्र), निर्मल सिंग (गुजरात). ८0 किलो : १. अमलेश सिंग यादव (उत्तर प्रदेश), २. चंद्रशेखर शिंदे (महाराष्ट्र), ३. एम. नागराज (कर्नाटक), कृष्णन कुमार (हरियाणा).
८५ किलो : १. विनय कुमार यादव (उत्तर प्रदेश), २. पांडुरंग पवार (महाराष्ट्र), ३. नीलेश गोस्वामी (गुजरात), ३. रोहतष (राजस्थान).
९८ किलो : १. पवन डी., २. राकेश कुमार (बिहार), ३. व्ही. जी. कंदारकर (महाराष्ट्र), जे. चौधरी (गुजरात). ९८ ते १३0 किलो : १. जी. बी. पाटील (महाराष्ट्र), २. शांती स्वरुप (राजस्थान), एम. जे. मन्सूरी (गुजरात), राजेश (हरियाणा). 

Web Title:  Sakshi Malik and fogat sisters brought women wrestling - Kaka Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Indiaभारत