एवढे पगार वाढले की, कर्मचारी वेडे झाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 12:13 AM2018-10-11T00:13:00+5:302018-10-11T00:14:17+5:30
एसटी महामंडळाच्या कर्मचा-यांचे पगार एवढे वाढले की ते वेडे झाले, असे वादग्रस्त वक्तव्य बुधवारी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केले.
औरंगाबाद : एसटी महामंडळाच्या कर्मचा-यांचे पगार एवढे वाढले की ते वेडे झाले, असे वादग्रस्त वक्तव्य बुधवारी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी औरंगाबादेत पत्रकारांशी बोलताना केले.
एसटी महामंडळ आणि औरंगाबाद स्मार्ट सिटी विकास महामंडळादरम्यान गुरुवारी सामंजस्य करार झाला. दोघांच्या संयुक्त विद्यमाने शहर बससेवा चालविण्यात येणार आहे. शहर बससेवेसंदर्भात आणि या सामंजस्य कराराविषयी रावते यांनी विभागीय आयुक्तालयात पत्रकारांना माहिती दिली.
गतवर्षी ऐन दिवाळीत एसटी कर्मचा-यांनी पगारवाढीसाठी बेमुदत संप केला होता. त्यामुळे एसटी महामंडळाच्या कर्मचा-यांच्या पगारवाढीसंदर्भात, सध्याच्या पगारातच शहर बससेवाही चालवावी लागणार का, याविषयी पत्रकारांनी रावते यांना प्रश्न केला. तेव्हा उत्तर देताना रावते यांनी वादग्रस्त विधान केले. ‘तुम्ही कोणत्या सालात आहात, पगार वाढले, एवढे पगार वाढले की तेच वडे झाले, असे वक्तव्य रावते यांनी केले. ‘मी अधिकृत बोलतोय,’ असेही रावते म्हणाले. कर्मचा-यांनी जास्त क ाम केले तर त्यांना ओव्हरटाईमदेखील दिला जातो, असेही ते म्हणाले.