नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी ७0 अर्जांची विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2016 11:33 AM2016-02-26T11:33:10+5:302016-02-26T11:39:55+5:30
नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीचा सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीत नामनिर्देनपत्र विक्री करण्याच्या पाचव्या दिवसअखेर ७0 नामनिर्देशन पत्राची विक्री झाली
नांदेड : नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीचा सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीत नामनिर्देनपत्र विक्री करण्याच्या पाचव्या दिवसअखेर ७0 नामनिर्देशन पत्राची विक्री झाली आहे. तर सर्वसाधारण सहकारी संस्था मतदारसंघातून आजपर्यंत एका उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पाच दिवसांत ७0 नामनिर्देशनपत्राची विक्री झाल्याने बाजार समितीची निवडणूक दुष्काळामध्ये रंगण्याची शक्यता वाटत आहे.
वेळोवेळी या-ना त्या कारणाने लांबणीवर पडलेल्या बाजार समितीच्या निवडणुकीला अखेर मुहूर्त लागला आहे. या निवडणुकीत काँग्रेसविरुद्ध महाआघाडी होणार की काँग्रेसचा मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी हातमिळवणी करणार हे अद्याप स्पष्ट झाले नाही. त्यामुळे इच्छुकांची संख्या मोठी असली तरी ऐनवेळी कोणाचा पत्ता कट होणार आणि कोणाला संधी मिळणार हे सांगणेही कठीण आहे. त्यामुळे इच्छुकांची संख्या जास्त झाल्यास काही पक्षातील कार्यकर्ते बंड करुन अपक्ष निवडणूक रिंगणात उभे राहण्याची शक्यता आहे. उमेदवारी कोणाला द्यायची यासंदर्भात अद्याप कोणत्याही पक्षाकडून निर्णय झाला नाही. त्यामुळे कार्यकर्तेही संभ्रमावस्थेत आहेत. परंतु जिल्हा मध्यवर्ती बँक, मजुर फेडरेशन व भाऊराव सहकारी साखर कारखाना निवडणुकीत काँग्रेस विरुद्ध महाआघाडी निवडणुक रिंगणात उतरली होती.
त्याचवेळी आता लोहा आणि नायगाव या दोन बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रमही घोषीत झाला आहे.