दीव-दमणहून आणलेल्या विदेशी दारूची औरंगाबादेत विक्री; 'एक्साईज'चा तीन ठिकाणी छापा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2022 03:15 PM2022-07-15T15:15:27+5:302022-07-15T15:15:58+5:30
उत्पादन शुल्क विभागाची रात्रभर मोहीम : २३ लाख ४६ हजार ८९५ रुपयांचा मुद्देमाल जप्त
औरंगाबाद : राज्यात बंदी असलेल्या दीव-दमण येथील विदेशी दारू शेकडो किलोमीटरचा प्रवास करून जालना, बीडकीन, नाशिक जिल्ह्यातील विविध हॉटेलचालकांना विकण्यात आली. या अवैध दारूची माहिती मिळाल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने बुधवारी रात्रभर शोधमाेहीम राबवून तीन ठिकाणांहून दारूसह २३ लाख ४६ हजार ८९५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती अधीक्षक संतोष झगडे यांनी दिली.
केंद्रशासित प्रदेश असलेल्या दीव येथून तीन गाड्यांमधून नाशिकच्या डोंगराळ भागातून विदेशी मद्य मोठ्या प्रमाणात आणण्यात आले होते. आरोपींनी नाशिक जिल्ह्यातील वणी येथे त्यातील ११ दारूचे बॉक्स हॉटेलचालकाला दिले. त्यानंतर त्याच गाड्यांमधून औरंगाबाद, जालना आणि बीडकीन येथील हॉटेल, दारू दुकानदारांना माल देण्यासाठी आणला होता. बाहेरच्या राज्यातील दारूचा साठा शहरात आल्याची गोपनीय माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकास मिळाली. त्यानुसार अधीक्षक संतोष झगडे यांच्या नेतृत्वात सिडको उड्डाणपुलाखाली दारूचा साठा असलेली गाडी पकडली. त्यात आरोपी अजय मोतीलाल जैस्वाल (रा. निरजा बिल्डिंग, दिशानगरी, सातारा परिसर) आणि राजकुमार गुलजाराराम माल्ही (रा. कल्याण वेस्ट, जि. ठाणे) या दोघांना पकडले. या आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातील बदनापूर येथील गाेरख लांबे यास दारू दिल्याचे स्पष्ट झाले. उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने रातोरात बदनापूर गाठून लांबे याच्या घरी छापा मारीत त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात दारूचा साठा जप्त केला. त्यानंतर कुख्यात आरोपी कृष्णा सीताराम पोटदुखे (रा. बाळापूर) याच्याकडे असलेला साठाही जप्त केला. ही कामगिरी अधीक्षक संतोष झगडे, निरीक्षक जावेद कुरेशी, राहुल गुरव, विजय राेकडे, दुय्यम निरीक्षक गणेश पवार, भरत दौंड, गणेश इंगळे, बालाजी वाघमोडे, गणेश नागवे, हजवान अनिल जायभाये, विजय मकरंद, ज्ञानेश्वर सांबारे, योगेश कल्याणकर, ठाणसिंग जारवाल, गणपत शिंदे, युवराज गुंजाळ, रविक मुरडकर यांच्या पथकाने केली.
एका आरोपीवर १५ गुन्हे
उत्पादन शुल्क विभागाने बाळापूर शिवारातून पकडलेला आरोपी कृष्णा पोटदुखे याच्यावर ग्रामीण पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागात तब्बल १५ पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. सतत अवैध दारूची विक्री करताना पकडल्यानंतर कारागृहात जातो आणि तेथून सुटल्यानंतर पुन्हा नव्याने गुन्हा करत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. इतरही आरोपींवर दारूबंदी कायद्यानुसार गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. त्यात आरोपींची संख्याही वाढण्याची शक्यता आहे.
देणा- घेणाऱ्यांना आरोपी बनवणार
राज्य उत्पादन शुल्क विभागाने दीव येथून आणलेला दारूचा साठा पकडल्यानंतर तो ज्याठिकाणी दिला तेथूनही जप्त केला. घेणाऱ्यांनाही आरोपी केले आहे. आणणारे गजाआड झाले. ज्याठिकाणाहून नियमबाह्य दारूचा साठा देण्यात आला. त्यांनाही आरोपी करण्यात येणार आहे. त्यातून कोणाचीही सुटका होणार नाही. खोलवर तपास केला जाईल. तसेच पकडलेल्या एका आरोपीवर एमपीडीए कायद्यातंर्गत कारवाईचा प्रस्तावही तयार करण्यास सुरुवात केली आहे. काही प्रकरणांत मोक्का कायद्यानुसार कारवाई प्रस्तावित असल्याची माहिती अधीक्षक संतोष झगडे यांनी दिली.