कोट्यवधींची जमीन बनावट कागदपत्रांच्या परस्पर विकली, आठ जणांच्या विरोधात गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 07:28 PM2024-07-29T19:28:01+5:302024-07-29T19:28:07+5:30

चिकलठाणा पोलिस ठाण्यात आठ जणांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

Sale of land worth crores through forged documents, case against eight persons | कोट्यवधींची जमीन बनावट कागदपत्रांच्या परस्पर विकली, आठ जणांच्या विरोधात गुन्हा

कोट्यवधींची जमीन बनावट कागदपत्रांच्या परस्पर विकली, आठ जणांच्या विरोधात गुन्हा

छत्रपती संभाजीनगर : देवळाई शिवारातील गट नंबर ८३ मधील पाच जणांची सामायिक कोट्यवधी रुपयांची २५ गुंठे जमिनी बनावट कागदपत्रांच्या आधारे परस्पर विक्री करून फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार आठ जणांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा चिकलठाणा पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आला आहे.

आरोपींमध्ये अशोक पुंडलिकराव शहाणे, कचरुलाल रामचंद्र बांगड, सुभाष रामचंद्र बांगड, विनोद शिवलिंग अप्पा फसके, सुजित मदनलाल कासलीवाल, रेखा मदनलाल कासलीवाल, प्रकाश विठ्ठलराव चोले आणि अनिता प्रकाश चोले यांचा समावेश आहे. शितल गंगवाल, प्रवीण देशमुख आणि संतोष जैन यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, तिघांसह विनोद फसके व नंदादेवी भक्कड यांनी देवळाई शिवारातील गट नंबर ८३ मध्ये २५ गुंठे जमीन जून २००१ मध्ये अनीस खॉ महमूद खॉ पठाण यांच्याकडून खरेदी केली. त्यात फिर्यादी तिघांची १३ गुंठे आणि विनोद फसके ६ व नंदादेवी बक्कड यांची ६ गुंठे जमीन आहे. ही सर्व जमीन अविभक्त व सामायिक आहे.

डिसेंबर २०२२ मध्ये या जमिनीवर त्यांच्या नावाचा बोर्ड काढून रेखा मदनलाल कासलीवाल यांच्या नावाचा बोर्ड लावण्यात आला. तेव्हा त्यांना विचारपूस केली असता, त्यांनी फुलंब्री येथील दुय्यम निबंधक कार्यालयात जमिनीची रजिस्ट्री केल्याचे सांगितले. त्या रजिस्ट्रीनुसार त्यांनी ६१ गुंठे जमीन इम्तियाज खान सरदार खान यांच्याकडून विकत घेतली आहे; परंतु मुळ मालकी फक्त ६१ गुंठे असताना त सुभाष बांगड, कचरूलाल बांगड व अशोक शहाणे यांनी ८६ गुंठे जमिनीचे बनावट लेआउट बनवून घेत तत्कालीन ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक व सरपंचास हाताशी धरून अवैध लेआउट मंजूर करून घेतले. त्यावेळी कोणतेही कागदपत्रे नसताना फिर्यादींच्या मालकीची २५ गुंठे जमीन लेआउटमध्ये बेकायेदशीररीत्या समाविष्ट केली, तसेच भूमी अभिलेखच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून जमिनीची मोजणीही करून घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यासाठी बनावट कागदपत्रांचा आधार घेतल्यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार आठ जणांच्या विरोधात चिकलठाणा ठाण्यात गुन्हा नोंदवला असून, अधिक तपास उपनिरीक्षक रविकिरण दरवडे करीत आहेत.

Web Title: Sale of land worth crores through forged documents, case against eight persons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.