विक्रीकर निरीक्षक नियुक्तीच्या प्रतीक्षेत; निकाल लागून उलटले सहा महिने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 07:15 PM2018-06-15T19:15:52+5:302018-06-15T19:26:26+5:30
विक्रीकर निरीक्षक परीक्षेचा निकाल लागून सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लोटला तरी यशस्वी विद्यार्थ्यांना अद्याप रुजू करून घेण्यात आले नाही
औरंगाबाद : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या विक्रीकर निरीक्षक परीक्षेचा निकाल लागून सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लोटला तरी यशस्वी विद्यार्थ्यांना अद्याप रुजू करून घेण्यात आले नसल्याने यशस्वी उमेदवारांमध्ये नाराजी पसरली असल्याचे सतीश जाधव, लखन पाटील, अंगद काळदाते, कृष्णा बागूल, विष्णू साळुंके, राजेश देशमुख, अजय मुठे, गणेश पवार, महेश बरबोले आदींनी कळविले आहे.
यासंदर्भात सतीश जाधव यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, या परीक्षेची जाहिरात ३ नोव्हेंबर २०१६ ला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रसिद्ध केली होती. ३ जून २०१७ रोजी या पदाची मुख्य परीक्षा घेण्यात आली. परीक्षेचा निकाल लागण्यास ६ महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लागला. पुढच्या कारवाईसाठी विक्रीकर विभागास संपर्क साधला असता मंत्रालयातून भरतीप्रक्रियेसंबंधी शिफारस आली नाही, असे उत्तर मिळाले. या परीक्षेचा निकाल लागल्यानंतर एक्साईज इन्स्पेक्टर, असिस्टंट सेक्शन आॅफिसर व असिस्टंट मोटर व्हेईकल इन्स्पेक्टर या पदासाठीची कागदपत्रे पडताळणी व इतर कारवाई, तसेच भरतीही सुरू झाली. या परीक्षांची जाहिरातही २०१७ सालची आहे; परंतु २०१६ साली जाहिरात निघालेल्या विक्रीकर परीक्षेत जी १८१ मुले उत्तीर्ण झाली, त्यांचीच भरती का नाही, असा सवाल सतीश जाधव यांनी उपस्थित केला आहे.
पदवीनंतर स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी लागणारा कालावधी, विद्यार्थ्यांचे तिशीतील वय, परीक्षा होऊन झालेला एक वर्षाचा काळ व ग्रामीण भागातील मुलांचे प्रमाण, या सर्व बाबींचा विचार करून भरती प्रक्रिया तातडीने सुरू करावी, असा आग्रह यशस्वी उमेदवार धरीत आहेत.