सॅल्यूट, घाटी रुग्णालयात बाळासह रोज ५ मातांनाही डाॅक्टर देतात नवा जन्म

By संतोष हिरेमठ | Published: April 11, 2024 07:14 PM2024-04-11T19:14:27+5:302024-04-11T19:14:42+5:30

‘निअर मिस’ : मातामृत्यू कमी करण्यात यश, पण गरोदरपणात आजही मातांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष

Salute! In Ghati hospital, doctors give new birth to 5 mothers with babies every day | सॅल्यूट, घाटी रुग्णालयात बाळासह रोज ५ मातांनाही डाॅक्टर देतात नवा जन्म

सॅल्यूट, घाटी रुग्णालयात बाळासह रोज ५ मातांनाही डाॅक्टर देतात नवा जन्म

छत्रपती संभाजीनगर : प्रसूतीच्या वेळी दररोज ५ मातांना नवा जन्म देण्याची किमया डाॅक्टर करत आहे. तुम्ही म्हणाल, अहो बाळाचा जन्म, मातांचा नव्हे. पण विविध आजार, कारणांमुळे प्रसूतीदरम्यान गुंतागुंत निर्माण होऊन अनेक माता मरणाच्या दारात झुंज देतात. या मातांना मृत्यूच्या दाढेतून सुखरूप परत आणण्याची किमया घाटी रुग्णालयातील प्रसूतीशास्त्र विभागातील डाॅक्टर करीत आहे. याला वैद्यकीय भाषेत ‘निअर मिस’ असे म्हटले जाते. दरवर्षी ११ एप्रिलला ‘राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस’ साजरा करण्यात येतो. महिलांना सन्मानपूर्वक मातृत्व सेवा मिळाली पाहिजे, यादृष्टीने घाटीतील स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभाग प्रयत्न करत आहे.

वर्षभरात १८०० माता सुखरूप
अतिरक्तस्त्राव, इन्फेक्शन यासह अनेक कारणांनी गरोदर मातांची प्रकृती धोक्यात येते. दररोज किमान ५ मातांना सुखरूपणे मृत्यूच्या दारातून बाहेर काढले जाते. ही संख्या वर्षभरात १८०० आहे. या केसला ‘निअर मिस’ असे म्हटले जाते, असे प्रसूतीशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डाॅ. विजय कल्याणकर म्हणाले.

माता मृत्यूची कारणे :
- उच्चरक्तदाब
- इन्फेक्शन
- ॲनिमिया
- प्रसूतीदरम्यान अति रक्तस्त्राव
- गरोदरपणात कावीळ होणे
- मधुमेह, हृदयरोगासह सहव्याधी
- लठ्ठपणा
- अति कमी वजन

घाटीत असे घटले माता मृत्यूचे प्रमाण
वर्ष- मृत्यू

२०२१-१०५
२०२२-९४
२०२३-६४

घाटीतील प्रसूतींची स्थिती
वर्ष- नैसर्गिक प्रसूती- सिझेरियन प्रसूती

२०२३- १४,९७७-४,४७४
२०२२- १४,१६८-४,७६५
२०२१-१२,७१९-४,३४७

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील माता मृत्यू
२०२०- २१ : ५
२०२१- २२ : २
२०२२-२३ : २
२०२३-२४ : ३

मरणासन्न अवस्थेत दाखल
अनेक माता मरणासन्न अवस्थेत दाखल होतात. त्यामागे अनेक कारणे असतात. गरोदर मातांच्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे. गरोदरपणात नियमितपणे तपासणी केली पाहिजे आणि आवश्यक ते उपचार घेतली पाहिजे.
- डाॅ. श्रीनिवास गडप्पा, स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागप्रमुख, घाटी

नियमित तपासणी महत्त्वाची
गरोदरपणात नियमित तपासणी महत्त्वाची आहे. हायरिस्क गरोदरमातांची ९ महिन्यांत किमान ८ तपासण्या झाल्या पाहिजे. माता मृत्यूचे प्रमाण ग्रामीण भागात कमी आहे. घाटीत इतर जिल्ह्यांतून माता येतात. त्यामुळे संख्या अधिक दिसते.
- डाॅ. अभय धानोरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी

Web Title: Salute! In Ghati hospital, doctors give new birth to 5 mothers with babies every day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.