सलाम त्या मातृत्वाला ! आईच्या किडनीने मृत्युच्या दारातील मुलीला मिळाले जीवनदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2022 04:00 PM2022-01-03T16:00:18+5:302022-01-03T16:20:34+5:30

६३ वर्षीय आईच्या धाडशी निर्णयाने ४० वर्षीय विवाहित मुलीला मिळाले जीवनदान

Salute to Motherhood! Mother's kidney gives life to daughter | सलाम त्या मातृत्वाला ! आईच्या किडनीने मृत्युच्या दारातील मुलीला मिळाले जीवनदान

सलाम त्या मातृत्वाला ! आईच्या किडनीने मृत्युच्या दारातील मुलीला मिळाले जीवनदान

googlenewsNext

- श्यामकुमार पुरे
सिल्लोड : आई शेवटी आईच असते, ती आपल्या मुलांना कधीच दुःखी पाहू शकत नाही. आपल्या जीवाची पर्वा न करता ६३ वर्षीय आईने आपल्या विवाहित ४० वर्षीय मुलीस किडनी देत जीवनदान दिले आहे. नव वर्षात १ जानेवारीला हे किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया औरंगाबादेत झाली. ६३ व्या वर्षी आईने आपल्या मुलीसाठी धाडशी निर्णय घेतल्याची घटना सिल्लोड तालुक्यातून पुढे आली आहे.

सिल्लोड तालुक्यातील पांगरी येथील छाया अशोक झरवाल (४०) या गेल्या ३ वर्षांपासून किडनीच्या आजाराने त्रस्त होत्या. त्यांच्या दोन्ही किडन्या अचानक निकामी झाल्याने औरंगाबाद येथील एका खासगी रुग्णालयात किडनी रोग तज्ज्ञ डॉ. सचिन सोनी यांनी त्यांच्यावर उपचार केले. गेल्या सहा महिन्यांपासून डायलिसिस प्रक्रियेवर छायाबाई जगत होत्या. पण ही प्रक्रिया जास्त काळ रुग्णाला वाचवू शकत नसल्याने शेवटचा पर्याय म्हणून किडनी प्रत्यारोपणाचा निर्णय घेण्यात आला. छायाबाईच्या घरची परिस्थिती जेमतेम असल्याने पुढे काय करावे, असा प्रश्न त्यांना पडला होता.
छायाबाईसह त्यांच्या कुटुंबावर किडनी दाता आणायचा कुठून असे एक ना अनेक प्रश्न पडत होते. त्यातच छायाबाईची प्रकृती दिवसेंदिवस खराब होत असल्याने डॉक्टरांनी तातडीने निर्णय घेण्याचे नातेवाईकांना सांगितले होते.

या घटनेची माहिती छायाबाई यांच्या आई रुखमनबाई माहोर (६३, रा. पांगरी) यांना कळताच, त्यांनी क्षणाचाही विचार न करता आपली किडनी मुलीस देण्याचा निर्णय घेतला. आई कधीही आपल्या मुलांना दु:खी बघू शकत नाही. त्यामुळे रुखमनबाई यांनी ना आपल्या वयाचा विचार केला ना परिस्थितीचा, क्षणात मुलास किडनी देण्यासाठी त्या रुग्णालयात हजर झाल्या. शनिवारी (दि.१) औरंगाबादेतील एका खासगी रुग्णालयात किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया डॉ. अभय महाजन, डॉ. चिंचोळे, डॉ. बरनेला, डॉ. प्रदीप मुरके यांच्या उपस्थितीत झाली. छायाबाईसह त्यांची आई रुखमनबाई या माय, लेकीची प्रकृती उत्तम असून त्यांच्यावर पुढील उपचार करण्यात येत आहे.

हेही वाचा - वृद्धापकाळात आईला घराबाहेर काढणाऱ्या मुलांना चपराक, मुलींनीच पार पाडले सर्व अंत्यविधी

Web Title: Salute to Motherhood! Mother's kidney gives life to daughter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.