यंदाही घरातूनच तथागतांना वंदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:04 AM2021-05-26T04:04:16+5:302021-05-26T04:04:16+5:30
औरंगाबाद : कोरोनाचे संकट अजून टळलेले नाही. दया, करुणा व मैत्री बुद्धांच्या या शिकवणीप्रमाणे या महामारीत दुसऱ्याची काळजी घेण्यासाठी ...
औरंगाबाद : कोरोनाचे संकट अजून टळलेले नाही. दया, करुणा व मैत्री बुद्धांच्या या शिकवणीप्रमाणे या महामारीत दुसऱ्याची काळजी घेण्यासाठी उपासकांनी बुधवारी २६ मे रोजी सार्वत्रिक कार्यक्रमाचे आयोजन न करता घरातूनच तथागत भगवान गौतम बुद्धांची जयंती साजरी करावी, असे आवाहन भदन्त बोधिपालो महास्थवीर, भदन्त विशुद्धानंदबोधी महास्थवीर, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष किशोर जोहरे यांनी केले आहे.
कोरोनाची दुसरी लाट थोपविण्यासाठी उपासक- उपासिकांनी शासनाच्या नियमांचे पालन करून घरातूनच तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा २५६५ वा जयंती महोत्सव साजरा करावा. घराघरांवर पंचशील ध्वज फडकावून त्रिशरण, पंचशील, आर्यआष्टांगिक मार्गाचे पठण करावे. घरातील सर्वांनी शुभ्रवस्त्र परिधान करून तथागतांच्या प्रतिमेची पुष्प, दीप, धुपाने पूजा करावी. विहारांमध्ये भिक्खूंनी गर्दी न जमवता पूजा, परित्राणपाठ व तथागत बुद्धांच्या प्रतिमेला वंदन करावे. उद्या बुधवारी सकाळी ९ वाजता आयोजित केलेल्या भिक्खू संघाच्या ऑनलाइन कार्यक्रमात सहभागी व्हावे, असा संदेश भदन्त बोधिपालो महास्थवीर यांनी समाजबांधवांंना दिला आहे.
दुसरीकडे, भदन्त नागसेन व बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष किशोर जोहरे यांनी कळविले की, बुद्धलेणीच्या पायथ्याला विपश्यना सभागृहात मोजक्याच भिक्खू व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पहाटे ५ वाजेपासून ध्यानसाधना, परित्राणपाठ, तसेच सकाळी ८ वाजता धम्मध्वजारोहणाचा कार्यक्रम होईल. यावेळी समता सैनिक दलाच्या वतीने नियमांचे पालन करून मानवंदना दिली जाईल. भन्ते ज्ञानरक्षित यांनी कळविले की, धम्ममय भारत मिशनअंतर्गत उद्या पहाटे ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत ऑनलाइन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात भाग घेणाऱ्या प्रत्येकाला धम्ममय भारत मिशनअंतर्गत प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
चौकट.....
श्रामणेर शिबिरावर बंधन
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, विजयादशमी व बुद्ध जयंतीचे औचित्य साधून ठिकठिकाणी श्रामणेर शिबिरांचे आयोजन केले जात होते; परंतु गेल्या वर्षापासून कोरोनाचे संकट आल्यामुळे अशा प्रकारची शिबिरे आयोजित करण्यावर बंधने आली आहेत, असे भदन्त नागसेन व भदन्त ज्ञानरक्षित यांनी सांगितले.