संभाजी ब्रिगेडला हवी शिवसेनेच्या कोट्यातून बुलढाणा आणि हिंगोली लोकसभा सीट
By बापू सोळुंके | Published: August 4, 2023 08:16 PM2023-08-04T20:16:29+5:302023-08-04T20:16:57+5:30
शिवसेना आण संभाजी ब्रिगेड युतीच्या वर्षभरात ९ बैठका
छत्रपती संभाजीनगर: गतवर्षी शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर शिवसेनने गतवर्षी २६ ऑगस्ट रोजी संभाजी ब्रिगेडसोबत युती केली होती. या युतीने वर्षभरात एकापाठोपाठ ९ संयुक्त बैठका घेतल्या. संभाजी ब्रिगेडला हिंगोली आणि बुलढाणा लोकसभेची जाग हवी आहे. या पार्श्वभूमीवर आता दहावी बैठक उद्या शनिवारी मुंबईच्या बांद्रा येथील रंगशारदा सभागृहात होत आहे. या बैठकीला शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडचे प्रत्येकी ३०० पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
गतवर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत उभी फुट पडली आणि महाविकास आघाडी सरकार कोसळले. या घटनेनंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना हा नवीन पक्ष अस्तित्वात आला. या पक्षाने गतवर्षी संभाजी ब्रिगेड या पक्षासोबत युती केली. ही युती झाल्यापासून आजपर्यंत राज्यात सार्वत्रिक निवडणूका झाल्या नाहीत. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा आणि राज्य विधानसभेची निवडणूक आणि स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक एकत्र लढण्याचा निर्णय घेतला. उबाठा शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या वर्षभरात ९ बैठका घेतल्या. यातील तीन बैठकांना पक्षप्रमुख ठाकरे स्वत: उपस्थित होते. तर अन्य ६ बैठकां शिवसेना नेत्यांच्या उपस्थितीत झाल्याची माहिती प्राप्त झाली.
शिवसेना महाविकास आघाडीचा घटक पक्ष असला तरी संभाजी ब्रिगेडला महाविकास आघाडीत स्थान देण्यात आलेले नाही. महाविकास आघाडीतील जागा वाटपानंतर शिवेसनेला प्राप्त होणाऱ्या एकूण सीटमधून हिंगोली आणि बुलडाणा लोकसभा मतदार संघाच्या सीट हव्या आहेत. ही बाब संभाजी ब्रिगेडने यापूर्वीच्या बैठकामधून शिवसेनेला सांगितल्याची माहिती सुत्राने दिली. दरम्यान संभाजी ब्रिगेडची उबाठासोबत युती असली तरी स्थानिक पातळीवरील दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यामध्ये समन्वय दिसत नाही. परिणामी शिवसेनेच्या आंदोलनात अथवा कार्यक्रमात संभाजी ब्रिगेडला बोलावले जात नसल्याचे चित्र नजरेस पडते. दरम्यान, उद्या शनिवारी उबाठा शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड पदाधिकाऱ्यांची मुंबईत बैठक होत आहे.