संभाजी उद्यानाचा होणार कायापालट
By Admin | Published: August 10, 2014 11:54 PM2014-08-10T23:54:23+5:302014-08-11T00:03:16+5:30
संभाजी उद्यानाचा होणार कायापालट
जालना : अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर जालना येथील संभाजी उद्यानात नवीन खेळणी बसविण्याच्या कामास नगरपालिकेने सुरूवात केली आहे. जवळपास ३० लाख रूपयांची ही खेळणी असून, शहरातील एकमेव विरंगुळा असलेल्या ठिकाणी आता या नवीन खेळणीमुळे उद्यानातील सौंदर्यात भर पडणार आहे. बच्चे कंपनीही आनंदित होणार आहे.
माजी नगराध्यक्ष पद्या भरतीया यांच्या संकल्पेनुसार संभाजी उद्यान येथे चिल्ड्रन पार्क आधारावर उद्यानात बच्चे कंपनीकरीता नवीन खेळणी बसविण्याच्या प्रक्रियेला शनिवार पासून सुरूवात करण्यात आली. गेल्या अनेक वर्षापासून या उद्यानात चिमुकल्यांसाठी पुरेशी खेळणी उपलब्ध नव्हती. या प्रकरणी लोकमतने अनेक वेळा पाठपुरवाही केला होता.
नगर पालिकेने तीस लाख रूपये खर्च करून उद्यानाचा नवीन खेळणी बसविण्याचे काम हाती घेतले आहे.
यात प्रामुख्याने लहान मुलांसाठी प्लास्टीक घसरगुंडी, सीसॉ, झोका, जिम्नॅस्टिक या सारख्या अनेक लहान मोठ्या खेळण्यांचा समावेश करण्यात आला आहे. ठिकठिकाणी फायबरचे बाकडे आणि कचराकुंड्याचांही यात समावेश आहे. यासाठी नाशिक येथील एका खासजी एजन्सीच्या माध्यमातून हे काम सुरू आहे. संपूर्ण खेळणी बसविण्यासाठी एका आठवड्याचा कालावधी लागणार असल्याची माहिती उपनगराध्यक्ष शाल आलम खान यांनी सांगितले.
दरम्यान, मोतीबागेप्रमाणेच तलाव परिसराचाही विकास करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. तलावाचे सुशोभिकरण केल्यास मोठे पर्याटन केंद्र तयार होऊ शकते. सुशोभिकरणही प्रस्तावित असल्याचे समजते. (प्रतिनिधी)