एकीच्या कागदपत्रावर दुसरीला नोकरी, संस्थाचालकासह सात जणांविरोधात गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 23:08 IST2019-03-04T23:06:58+5:302019-03-04T23:08:04+5:30
मुलाखतीसाठी आलेल्या एकीच्या कागदपत्रावर दुसरीचे छायाचित्र लावून तिला सेवेत घेऊन शिक्षण विभागाची तब्बल बारा लाखांची फसवणूक करण्यात आल्याचे समोर आले. याप्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात संस्थाचालकासह सात जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला.

एकीच्या कागदपत्रावर दुसरीला नोकरी, संस्थाचालकासह सात जणांविरोधात गुन्हा
औरंगाबाद : मुलाखतीसाठी आलेल्या एकीच्या कागदपत्रावर दुसरीचे छायाचित्र लावून तिला सेवेत घेऊन शिक्षण विभागाची तब्बल बारा लाखांची फसवणूक करण्यात आल्याचे समोर आले. याप्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात संस्थाचालकासह सात जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला.
असगरी बेगम सय्यद मोहम्मद अली, नूरजहॉबेगम वलीओद्दीन, शेख मुबीन शेख शोएब, अख्तर खान हुसेन खान, शेख मोहसीन शेख शोएब, शेख नाजीमोद्दीन निहालोद्दीन, इम्रान खान फारुख खान यांचा आरोपींमध्ये समावेश आहे. जिन्सी पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार सय्यद नजमा यांनी ३ मार्च रोजी जिन्सी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले की, त्यांचे शिक्षण एम.एस्सी.बी.एड.पर्यंत झालेले आहे. २००६ साली त्यांनी वर्तमानपत्रातील सहशिक्षकपदाची जाहिरात वाचून आरोपींच्या अलमोबीन शिक्षण संस्थेत मुलाखत दिली होती. त्यावेळी संस्थेच्या अध्यक्षा असगरी बेगम यांनी त्यांची मुलाखत घेतली आणि शैक्षणिक कागदपत्र ठेवून घेतले होते. नोकरीसाठी निवड झाली अथवा नाही, हे नंतर कळविते असे त्यांनी सांगितले होते. मुलाखतीनंतर संस्थेकडून त्यांना बोलावणे आले नाही. नंतर त्यांनी मौलाना आझाद ज्युनिअर कॉलेजमध्ये २००८ ते २०११ या कालावधीत काम केले. त्यानंतर त्या बीड जिल्ह्यातील गेवराई येथील इंदिरा गांधी इंग्रजी शाळेवर २०१२ ते १३ दरम्यान तात्पुरत्या स्वरूपात शिक्षकपदी कार्यरत होत्या. सन २०१३ ते २०१६ या कालावधीत अंजुमन इंमदादूत तुलबा या संस्थेत मुख्याध्यापकपदी त्यांनी नोकरी केली. तेव्हापासून त्या घरीच होत्या.
दरम्यान, पोलिसांकडून नजमा यांना समजले की, आरोपी संस्थाचालकाने त्यांच्या नावे दुसऱ्या महिलेचे छायाचित्र चिकटवून २००६ ते २०१२ या कालावधीत एका महिलेला शिक्षिका म्हणून संस्थेत नोकरीवर घेतले. त्यासाठी नजमा यांची शैक्षणिक कागदपत्रे जिल्हा परिषदेत सादर करून त्यांच्या नावाचे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत खाते उघडले. त्या खात्यात नजमा यांच्या नावे जमा झालेले वेतनाचे तब्बल १२ लाख रुपये त्यांनी परस्पर उचलून अपहार केला. हा प्रकार समजल्यानंतर नजमा यांनी जिन्सी पोलीस ठाण्यात संस्थाचालक आणि अन्य कर्मचाऱ्यांविरोधात तक्रार नोंदविली. सहायक निरीक्षक साईनाथ गिते तपास करीत आहे.