तोच उत्साह, तीच शिस्त!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 12:44 AM2017-08-02T00:44:41+5:302017-08-02T00:44:41+5:30
९ आॅगस्ट रोजी मुंबईत काढण्यात येणाºया मराठा क्रांती मूकमोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरात मंगळवारी जनजागृतीच्या उद्देशाने काढण्यात आलेल्या दुचाकी रॅलीत मराठा समाज बांधव प्रचंड संख्येने आणि शिस्तीत सहभागी झाले
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : ९ आॅगस्ट रोजी मुंबईत काढण्यात येणाºया मराठा क्रांती मूकमोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरात मंगळवारी जनजागृतीच्या उद्देशाने काढण्यात आलेल्या दुचाकी रॅलीत मराठा समाज बांधव प्रचंड संख्येने आणि शिस्तीत सहभागी झाले होते. हजारो दुचाकींचा रॅलीत सहभाग असल्यामुळे सुमारे दोन कि़मी.पर्यंतच्या परिसरात दुचाकी व ‘जाणता राजा’ लिहिलेले भगवे ध्वज दिसत होते. पूर्ण शहराचे लक्ष या रॅलीने वेधून घेतले.
मागील काही महिन्यांपासून मुंबईतील मोर्चाचे नियोजन करण्यासाठी समाजातील सर्व अंगीकृत संघटना व समाज बांधव ज्या मेहनतीने परिश्रम घेत आहेत, त्याचे फलित मंगळवारच्या दुचाकी रॅलीच्या रूपाने दिसून आले.
९ आॅगस्ट २०१६ पासून कोपर्डी घटनेच्या पार्श्वभूमीवर एकवटलेल्या मराठा समाजाच्या एकतेची वज्रमूठ कायम असून, विविध मागण्यांसाठी संयम, शांती आणि शिस्तीने समाज लढा देत आहे. मागच्या वर्षी ठिकठिकाणी निघालेल्या मराठा क्रांती मूकमोर्चाची ऐतिहासिक नोंद झाली, तर यावर्षीदेखील मुंबईचा मोर्चा ऐतिहासिक व दखलनीय ठरावा यासाठी पूर्ण तयारीनिशी समाज कार्यरत आहे.
शिवछत्रपती महाविद्यालय येथून शिस्तीमध्ये निघालेली ही रॅली जयभवानीनगर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पुढे सरकली. त्यानंतर पुंडलिकनगर येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. गजानन महाराज मंदिर मार्गे त्रिमूर्ती चौक ते आकाशवाणी जालना रोडवरून मोंढा उड्डाणपुलावर ही रॅली क्रांतीचौकातील छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून पुढे सरकली. क्रांतीचौकात जोरदार घोषणा देत शिस्तीने पैठणगेट मार्गे सिटीचौक ते लेबर कॉलनीपर्यंत रॅली आली. तेथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून टी.व्ही.सेंटर हडकोपर्यंत रॅली आली. तेथे छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर बजरंग चौक ते चिश्तिया चौकातून कॅनॉट गार्डनमध्ये रॅलीचा समारोप झाला. राष्ट्रगीताने रॅलीचा समारोप झाल्यानंतर ‘भारत माता की जय’ या घोषणेने परिसर दणाणून गेला. ९ आॅगस्टला मुंबईत निघणाºया क्रांती मोर्चामध्ये सहभागी होण्याचा निर्धार करीत रॅलीमधील सहभागी समाज बांधव शिस्तीने कॅनॉट गार्डन परिसरातून बाहेर पडले.