मध्यरात्रीचा थरार! सिग्नल झाकले, साखळी ओढली; औरंगाबादजवळ देवगिरी एक्सप्रेसवर दरोडा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2022 07:36 AM2022-04-22T07:36:22+5:302022-04-22T09:40:36+5:30
आठ ते दहा दरोडेखोर रेल्वेत चढले आणि त्यांनी प्रवाशांची लूटमार सुरू केली. जवळपास अर्धा तास हा प्रकार सुरू होता.
औरंगाबाद: औरंगाबादहून मुंबईकडे जाणाऱ्या देवगिरी एक्सप्रेसवर दरोडा पडल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री १२ वाजेच्या दरम्यान दौलताबाद- पोटूळ मार्गादरम्यान घडली. सिग्नलला कपडा बांधून रेल्वे थांबवून आठ ते दहा जणांच्या टोळीने लूटमार केल्याचे रेल्वे सुरक्षा दलाच्या सूत्रांनी सांगितले.
यापूर्वी याच मार्गावर १ एप्रिल २०२२ रोजी अशाच प्रकारे नंदीग्राम एक्सप्रेस आणि नांदेड-मनमाड पॅसेंजर रेल्वे थांबवून लूटमार केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर सुरक्षा वाढविण्यात आली होती. परंतु, गुरुवारी मध्यरात्री पुन्हा अशीच घटना घडल्याने रेल्वेच्या रात्रीच्या प्रवासाबरोबर सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
औरंगाबाद स्टेशनवरून देवगिरी एक्सप्रेस मुंबईकडे रवाना होताच गुरुवारी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास पोटूळ रेल्वेस्टेशन जवळ सिग्नलला कपडा बांधून रेल्वे थांबविण्यात आली. या दरम्यान आठ ते दहा दरोडेखोर रेल्वेत चढले आणि त्यांनी प्रवाशांची लूटमार सुरू केली. जवळपास अर्धा तास हा प्रकार सुरू होता. रेल्वे चालकांनी सतर्कता दाखवून रेल्वे पुढे नेण्याचा प्रयत्न केला. मात्र दरोडेखोर साखळी ओढून रेल्वे थांबवित होते.
या घटनेची माहिती रेल्वे सुरक्षा बळाला मिळताच अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेट किती प्रवासांची लूटमार झाली, किती ऐवज गेला हे उशीरापर्यंत समजू शकले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार घटनास्थळी एक रुग्णवाहिका होती. दरोडेखोरांनी याच रुग्णवाहिकेचा वापर केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
तुफान दगडफेक
S 5 ते 9 या डब्यावर तूफान दगडफेक झाली आहे, असे प्रत्यक्षदर्शी प्रवास्यांनी सांगितले. मोठ्या प्रमाणात आरडाओरडा झाल्याने प्रवास्यांनी दरवाजा व खिडक्या बंद करून घेतल्या, अशी माहिती रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी यांनी दिली