वानखेडे यांच्या आत्याने औरंगाबादेत केली तक्रार; नवाब मलिकांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2021 07:35 AM2021-11-10T07:35:33+5:302021-11-10T07:35:49+5:30
औरंगाबाद : कर्तव्य बजावत असताना समीर वानखेडे यांनी केलेल्या कारवाईवर चिखलफेक करीत अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी सातत्याने ...
औरंगाबाद : कर्तव्य बजावत असताना समीर वानखेडे यांनी केलेल्या कारवाईवर चिखलफेक करीत अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी सातत्याने मुस्लिम असल्याचे वक्तव्य करून समाजात व नातेवाइकांत बदनामी चालविली आहे. त्यामुळे संतापलेल्या समीर वानखेडे यांच्या आत्या गुंफाबाई गंगाधर भालेराव यांनी मलिक यांच्याविरोधात मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. मलिक यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
गुंफाबाई भालेराव यांनी कुटुंबातील नातेवाइकांची पूर्ण वंशावळ आणि जातीचे दाखलेही सोबत जोडले आहेत. मंत्री असतानाही मलिक मुस्लिम म्हणून हिणवत आहेत. वानखेडे कुटुंबीय नवबौद्ध नसून ते मुस्लिमच आहेत, असे म्हणून सतत परिवाराची बदनामी सुरू केली आहे. त्यामुळे नातेवाइकांना प्रचंड मनस्ताप झाला आहे. जातीयवादी वक्तव्य केल्यामुळे मलिक यांच्यावर ॲट्रॉसिटी कायद्याखाली गुन्हा दाखल करून कारवाई करावी, असे निवेदनात म्हटले आहे.
वानखेडे कुटुंबीय राज्यपाल भेटीला
एनसीबीचे क्षेत्रीय संचालक समीर वानखेडे यांच्या कुटुंबीयांनी मंगळवारी सायंकाळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनात भेट घेतली. वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर, वडील ज्ञानदेव वानखेडे आणि बहीण यास्मिन वानखेडे यांनी राज्यपालांशी चर्चा केली. समीर आणि आमच्या कुटुंबास खोटे पुरावे देऊन अडकवले जात आहे. सर्व बाबी आम्ही राज्यपालांसमोर मांडल्या. धैर्य ठेवा, लढा, सत्याचाच विजय होईल, असे राज्यपालांनी आम्हाला सांगितल्याचे रेडकर म्हणाल्या.