नरेंद्र माेदींच्या हस्ते 'समृद्धी'चे उद्घाटन; नागपूर ते औरंगाबादपर्यंत करणार हवाई पाहणी?

By विकास राऊत | Published: December 1, 2022 01:30 PM2022-12-01T13:30:01+5:302022-12-01T13:30:42+5:30

नागपूर येथूनच ११ डिसेंबर रोजी ५२० किलोमीटर अंतराच्या महामार्गाचे लोकार्पण होणार आहे.

Samriddhi Highway to start on December 11; Prime Minister will conduct an aerial inspection from Nagpur to Aurangabad? | नरेंद्र माेदींच्या हस्ते 'समृद्धी'चे उद्घाटन; नागपूर ते औरंगाबादपर्यंत करणार हवाई पाहणी?

नरेंद्र माेदींच्या हस्ते 'समृद्धी'चे उद्घाटन; नागपूर ते औरंगाबादपर्यंत करणार हवाई पाहणी?

googlenewsNext

- विकास राऊत
औरंगाबाद :
मुंबई ते नागपूर या ७२० किलोमीटरच्या समृद्धी महामार्गातील नागपूर ते शिर्डी या ५२० किलोमीटरच्या टप्प्याचे ११ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाने तयारी सुरू केली असून, पंतप्रधान मोदी या मार्गाची किमान औरंगाबादपर्यंत हवाई पाहणी करण्याची शक्यता एमएसआरडीसीच्या वरिष्ठ सूत्रांनी वर्तविली.

नागपूर येथूनच ११ डिसेंबर रोजी ५२० किलोमीटर अंतराच्या महामार्गाचे लोकार्पण होणार आहे. अद्याप वरिष्ठ पातळीवरून काही सूचना नाहीत, मात्र तारीख निश्चित मानली जात आहे. लोकार्पणासाठी समिती स्थापन होईल. समितीमध्ये लोकार्पणाशी निगडित सर्व मुद्द्यांवर चर्चा होईल. हवाई पाहणीसाठी वेळ नसल्यास वाहनाने काही अंतरापर्यंत पंतप्रधान समृद्धीवरून प्रवास करण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली.

जिल्ह्यात ११२ कि.मी. लांबीचा समृद्धीचा ३४०० कोटींचा टप्पा लोकार्पणासाठी सज्ज आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील काम १०० टक्के पूर्ण झाले आहे. या महामार्गामुळे मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडला गेल्याने दोन विभाग काही तासांच्या अंतरावर येणार आहेत. राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) या महामार्गाचे काम ३.४०० कोटींतून पूर्ण केले आहे. समृद्धी महामार्ग ७०१ कि.मी. लांबीचा असून, तो १० जिल्हे, २६ तालुके आणि ३९२ गावांना जोडणार आहे. मुंबई ते नागपूर हे अंतर ७ ते ८ तासांवर येणार आहे. औरंगाबाद तालुक्यातील ३५ गावे, गंगापूर ११ गावे, वैजापूरमधील १५ गावांतील जमीन महामार्गासाठी संपादित केली आहे. जालना जिल्ह्यातील २५ गावांतील भूसंपादन झाले आहे.

१६ पॅकेजेसमध्ये महामार्गाचे काम
१६ पॅकेजेसमध्ये महामार्गाचे काम झाले आहे. ८, ९ आणि १० ही तीन पॅकेज औरंगाबाद-जालन्यातील असून, त्यांचे काम पूर्ण झाले आहे. नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलढाणा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक, ठाणे जिल्ह्यातून हा महामार्ग गेला आहे.

जिल्ह्यातील ६१ गावांतून महामार्ग
औरंगाबाद जिल्ह्यातील ६१ गावांतील जमीन या महामार्गासाठी संपादित करण्यात आली आहे. १,६०० कोटींच्या आसपास भूसंपादनाचा मावेजा देण्यात आला आहे. जिल्ह्यात हर्सूलजवळ इंटरचेंज आहे. बोगद्याचे कामदेखील पूर्ण झाले आहे. मध्यंतरी अपघातांचे प्रमाण वाढल्यामुळे वेगमर्यादा ताशी १५० कि.मी.वरून १२० केली आहे.

Web Title: Samriddhi Highway to start on December 11; Prime Minister will conduct an aerial inspection from Nagpur to Aurangabad?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.