'समृद्धी'वरील वेगाच्या थरारात बचावले ६ जीव; कार चार कोलांट्या घेऊन रस्त्याच्या पलीकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2022 11:49 AM2022-12-27T11:49:26+5:302022-12-27T11:52:30+5:30
समृद्धी महामार्गावरील लासूर गाव ते पोटूळच्या दरम्यान भरधाव वेगात चारचाकीचे चाक फुटल्यामुळे अपघात घडला.
- शेख मुनीर
औरंगाबाद :समृद्धी महामार्गावरील वेगाच्या थरारात सहा जीव बचावल्याची घटना सोमवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास लासूर स्टेशन परिसरात घडली. गाडीने नागपूरकडे जाणारा रस्ता ओलांडून चार कोलांट्या घेत विरुद्ध दिशेच्या कडेला जाऊन गाडी आदळली. अपघातानंतर राष्ट्रीय महामार्गाच्या कर्मचाऱ्यांनी जखमींना मदत केली.
शिर्डी येथून एक आलिशान चारचाकी (एमएच ३१ ईके १३६२) नागपूरच्या दिशेने जात होती. या गाडीमध्ये दोन महिला, दोन पुरुष आणि दोन लहान मुले होती. हे सर्व जण समृद्धी महामार्गावरून नागपूरकडे जात होते. त्यांच्यासोबत आणखी एक गाडी होती. ती गाडी वेगात पुढे निघून गेल्यानंतर पाठीमागे पडलेल्या गाडीच्या चालकाने समृद्धीवरून थरारक पद्धतीने वाहन दामटण्यास सुरुवात केली. लासूर स्टेशनच्या पुढे निघाल्यानंतर पोटूळजवळ आल्यानंतर अतिवेगात असल्यामुळे गाडीचे चाक फुटले. त्यामुळे गाडीने नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावरून क्रॉसिंग करीत शिर्डीकडे जाणाऱ्या रस्त्यावर चार वेळा कलंडली.
या भीषण अपघातात सुदैवाने गंभीर इजा झाली नाही. सहा प्रवाशांना किरकोळ मार लागला. या प्रवाशांच्या मदतीसाठी महामार्गाच्या सुरक्षेसाठी असलेले कर्मचारी, रुग्णवाहिका तत्काळ घटनास्थळी पोहोचली. जखमींवर रुग्णवाहिकेतच तत्काळ उपचार करण्यात आले. यावेळी परिसरातील नागरिकांनीही घटनास्थळी पाहण्यासाठी गर्दी केल्याचे दिसून आले.