सम्यक विद्यार्थी आंदोलन आता शिष्यवृत्तीसाठी एल्गार पुकारणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2024 07:18 PM2024-08-23T19:18:50+5:302024-08-23T19:21:50+5:30

‘स्वाधार’साठी जाचक अटी रद्द करा,  बार्टीकडून अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना संशोधनासाठी शिष्यवृत्ती दिली जावी

Samyak Vidyarthi Andolan will now call Elgar for scholarship | सम्यक विद्यार्थी आंदोलन आता शिष्यवृत्तीसाठी एल्गार पुकारणार

सम्यक विद्यार्थी आंदोलन आता शिष्यवृत्तीसाठी एल्गार पुकारणार

छत्रपती संभाजीनगर : महायुती सरकारकडून दलित विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहेत. संशोधक विद्यार्थ्यांना तीन वर्षांपासून शिष्यवृत्ती मिळत नाही. स्वाधार शिष्यवृत्तीसाठी जाचक अटी व शर्ती लागू केल्या आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीपासून वंचित राहावे लागणार आहे, यासह विविध मागण्यांसाठी राज्यभर एल्गार पुकारण्यात येणार आहे, असे सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे प्रदेश प्रवक्ते प्रशांत बोरडे यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेत प्रशांत बोरडे म्हणाले की, शासन- प्रशासनाकडून एनकेन प्रकारे आंबेडकरी समूहातील विद्यार्थ्यांची सातत्याने अडवणूक केली जात आहे. ‘महाडीबीटी’कडून दिली जाणारी शिष्यवृत्ती गेल्या दोन- तीन वर्षांपासून मिळत नाही. त्यामुळे उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक समस्येचा सामना करावा लागत आहे. महागाई निर्देशांकानुसार स्वाधार शिष्यवृत्ती योजनेत शिष्यवृत्तीची मागणी आहे. आता तर ‘स्वाधार’साठीही जाचक अटी लागू करण्यात आल्या आहेत. बार्टीकडून अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना संशोधनासाठी शिष्यवृत्ती दिली जात नाही. यासाठी पुण्याच्या बार्टी कार्यालयासमोर संशोधक विद्यार्थ्यांनी उपोषण सुरू केले आहे. मात्र, या आंदोलनाची सरकारकडून दखल घेतली जात नाही.

ज्या मनोवृत्तीचे सरकार असेल, तसेच प्रशासनसुद्धा वागते. गरिबांना मिळणारे मोफत शिक्षण बंद करून खासगीकरणाच्या माध्यमातून शिक्षणाची दारे उघडण्याचा डाव रचला जात आहे. मागील वर्षांपर्यंत दीड लाख विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली नाही. शिक्षणाचा मूलभूत अधिकार पूर्वीप्रमाणे मिळावा, तसेच बेरोजगार भत्ता सुरू करण्यात विविध मागण्यांसाठी लवकरच संघटनेच्या वतीने एल्गार पुकारण्यात येणार आहे. यावेळी वंचित बहुजन महिला आघाडीच्या प्रदेश महासचिव तथा जिल्हा प्रभारी अरुंधती शिरसाठ, योगेश बन, ॲड. पंकज बनसोडे व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

Web Title: Samyak Vidyarthi Andolan will now call Elgar for scholarship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.