वाळू माफियाची कारागृहात रवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 01:04 AM2017-10-15T01:04:23+5:302017-10-15T01:04:23+5:30
माजलगाव तालुक्यात वाळू चोरी करणा-या राजेगाव येथील अरुण अंबादास कचरे (४५) या माफियावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली. त्याची रवानगी हर्सूल कारागृहात झाली आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : माजलगाव तालुक्यात वाळू चोरी करणा-या राजेगाव येथील अरुण अंबादास कचरे (४५) या माफियावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली. त्याची रवानगी हर्सूल कारागृहात झाली आहे. ही कारवाई माजलगाव ग्रामीण पोलीस, स्थानिक गुन्हे शाखा व दरोडा प्रतिबंधक पथकाने केली.
माजलगाव ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पवार यांनी ३० सप्टेंबर रोजी एमपीडीए अंतर्गत स्थानबद्धतेचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्यामार्फत जिल्हा दंडाधिकारी एम. डी. सिंह यांना सादर केला होता. त्याच्याविरुद्ध वाळू चोरी गौण खनिज कायदा व महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ अन्वये सारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. यावरुन १४ आॅक्टोबर रोजी त्याला स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले. त्यानुसार त्याला बेड्या ठोकून औरंगाबादच्या हर्सूल कारागृहात रवानगी केली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे, पो. नि. संजय पवार, परमेश्वर सानप, अभिमन्यू औताडे, सुभाष महाडिक, श्रीमंत उबाळे, तुळशीराम जगताप, शेख आसेफ, अश्विन सुरवसे आदींनी केली आहे.