वाळूमाफियांचा रात्रीस खेळ चाले; एक हायवा करतो दोन-तीन खेपा, खबरे ठेवतात पोलिसांवर लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2023 04:26 PM2023-03-24T16:26:05+5:302023-03-24T16:26:49+5:30

हायवा निघाल्यापासून खबरे ठेवतात लक्ष : प्रत्येक हायवाला महिन्याकाठी मोजावे लागतात दीड लाख रुपये

Sand mafias play at night; One person makes two or three consignments, keeping an eye on the police | वाळूमाफियांचा रात्रीस खेळ चाले; एक हायवा करतो दोन-तीन खेपा, खबरे ठेवतात पोलिसांवर लक्ष

वाळूमाफियांचा रात्रीस खेळ चाले; एक हायवा करतो दोन-तीन खेपा, खबरे ठेवतात पोलिसांवर लक्ष

googlenewsNext

राम शिनगारे/शेख मुनीर
छत्रपती संभाजीनगर :
गोदावरी नदीसह इतर ठिकाणांहून शहरात वाळूची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते. वाळूच्या तस्करीसाठी मोठ्या हायवाचा वापर केला जातो. या हायवांवर नंबरही टाकण्यात येत नाही. विनानंबरच्या हायवातून वाळू शहरात आणली जाते. त्यासाठी वाळूमाफियांची माणसे नाक्यानाक्यांवर तैनात असतात. एकमेकांना फोन करून गाडीचे लोकेशन घेतात. काही संशय आल्यास त्या ठिकाणचा मार्गही तत्काळ बदलण्यात येतो. हा सर्व खेळ रात्री ११ वाजल्यापासून पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू असतो, असे 'लोकमत'च्या पाहणीत दिसले.

एका हायवासाठी पोलिस, महसूल यंत्रणेला १ लाख ७० हजार रुपयांपेक्षा अधिक मासिक हप्ताही द्यावा लागतो. प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत त्याचे वेगवेगळे दर आहेत. पोलिसांसोबत सेटिंग असल्यामुळे कोणत्याही गाडीला अडविण्यात येत नाही. बिनधास्तपणे गाडी शहरात येऊन ठरलेल्या ठिकाणी वाळू धुऊन घेतली जाते. त्यानंतर मागणी असलेल्या ठिकाणी वाळू टाकण्यात येत असल्याचेही पाहणीत आढळून आले.

सर्वजण झोपले की यांना उजाडते
सर्वजण झोपल्यानंतर वाळूमाफियांचा खेळ सुरू होतो. हा खेळ रात्री ११ वाजल्यापासून ते पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू असतो. हायवाच्या वाहतुकीचा अनेक भागांतील नागरिकांनाही त्रास होतो. मात्र, त्याकडे पोलिस, महसूल आणि आरटीओ विभागाकडून दुर्लक्ष करण्यात येते.

वाहतुकीसाठी नंबर नसलेले वाहन
बुधवारी रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत केलेल्या पाहणीत पैठण रोडवरून आलेल्या अनेक वाळूच्या हायवांना नंबर प्लेटच लावण्यात आलेली नव्हती. विनानंबरच्या हायवातून वाळूची तस्करी करण्यात येत असल्याचे दिसून आले. त्याशिवाय हे हायवा अतिशय वेगात घेऊन जात असल्याचेही निदर्शनास आले.

लिलाव नाही, मग वाळू कुठून येते?
जिल्ह्यात मागील एक वर्षांपासून वाळूचे लिलाव करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातून होणारा वाळूचा पुरवठा हा अवैध आहे. सध्या पैठण तालुक्यात मागील दोन महिन्यांपासून वाळू उपसा बंद आहे. काही चोरट्या मार्गाने केला जातो. मात्र, गंगापूर तालुक्यातील गोदापात्राजवळून वाळू मोठ्या प्रमाणात शहरात आणली जाते. त्याशिवाय फुलंब्री तालुका, अंबड, वडीगोद्री, जालना जिल्ह्यातूनही शहरात वाळू मोठ्या प्रमाणात आणली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

‘लोकमत’ने काय पाहिले?
पैठण रोडवर रात्री अकरा वाजेच्या आधीलेच वाळूच्या खेपा घेऊन हायवा आले. हे हायवा खाली केल्यानंतर पुन्हा वाळू आणण्यासाठी परत गेले. त्याच हायवात पहाटे ४ ते ५ वाजेच्या दरम्यान वाळूची दुसरी खेप करण्यात आली. नाथ व्हॅली शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावरून वाळूच्या हायवांची ये-जा मोठ्या प्रमाणात असते. त्याशिवाय वाळूज परिसरातही मोठ्या प्रमाणात वाळूची वाहतूक करताना हायवा दिसून आले. या हायवासाठी नाक्यानाक्यावर माफियांनी नेमलेले युवकांचे टोळके, चारचाकी गाड्यांमधून त्यांचे फिरणारे ‘समर्थक’ही दिसून आले.

महसूल, पोलिसांची ‘अर्थपूर्ण’ चुप्पी
वाळूच्या अवैध उत्खननाकडे महसूल विभागासह पोलिस प्रशासनाचे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष असल्याचेही पाहणीत आढळून आले. गंगापूर तालुक्यातील शहरात येणाऱ्या एका हायवाला महिन्याकाठी वाळूज, एमआयडीसी वाळूज, सातारा, ‘वाहतूक’चे दोन विभाग, गुन्हे शाखेला एकत्रितपणे अंदाजे १ लाख १० हजार रुपये महिन्याकाठी हप्त्याच्या स्वरूपात द्यावे लागतात. यात वाळूजच्या दोन ठाण्यांचे दर सर्वाधिक आहेत. त्याशिवाय शहरात इतर ठिकाणी वाळू घेऊन जायचे असेल तर त्याचे दर वेगळे असतात. महसूलला एका हायवासाठी ७० ते ८० हजार रुपये महिन्याकाठी द्यावे लागतात, अशी माहिती एका वाळू व्यावसायिकानेच नाव न छापण्याच्या अटीवर दिली. फुलंब्री, अंबड या भागांतून येणाऱ्या हायवांनाही याच प्रकारे मासिक हप्ते द्यावे लागतात.

शेतकऱ्यास १२ हजार रुपये
गोदावरी नदीच्या पात्रातून वाळू काढली जात नाही. नदीपात्राशेजारच्या शेतातून वाळू आणली जाते. त्यासाठी प्रत्येक हायवासाठी शेतकऱ्यास १० ते १२ हजार रुपये देण्यात येतात. शेतातील वाळूमध्ये काही प्रमाणात मातीही मिसळलेली असते. त्यामुळे ती वाळू धुण्यासाठी प्रतिहायवा १ हजार ५०० रुपये खर्च येतो.

किती वाहनांवर कारवाई झाली?
दोन महिन्यांत वाळूच्या केवळ सहा वाहनांवर महसूल विभागाने कारवाई केली आहे. पोलिस, आरटीओ विभागाने एकही कारवाई केलेली नाही.

Web Title: Sand mafias play at night; One person makes two or three consignments, keeping an eye on the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.