वाळूच्या ट्रकने दुचाकीस्वारास चिरडले
By Admin | Published: May 19, 2014 01:22 AM2014-05-19T01:22:23+5:302014-05-19T01:32:59+5:30
औरंगाबाद : वाळूची वाहतूक करणार्या भरधाव ट्रकने मोटारसायकलस्वारास चिरडल्याची हृदयद्रावक घटना बीड रोडवरील भालगाव फाट्याजवळ रविवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास घडली.
औरंगाबाद : वाळूची वाहतूक करणार्या भरधाव ट्रकने मोटारसायकलस्वारास चिरडल्याची हृदयद्रावक घटना बीड रोडवरील भालगाव फाट्याजवळ रविवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास घडली. अपघातग्रस्त ट्रक एवढ्या वेगात होता की समोरून येणार्या मोटारसायकलला धडक दिल्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटून तो ट्रक रस्त्याच्या कडेला शेतात जाऊन उलटला. यासंदर्भात पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, शेषराव विनायक घोरपडे (४८, रा. पिंप्रीराजा), असे मयत मोटारसायकलस्वाराचे नाव आहे. तो रात्रीच्या सुमारास मोटारसायकलवर (क्र. एमएच-२० एक्स-४०७२) बसून पिंप्रीराजाकडे निघाला होता. त्याचवेळी बीडकडून वाळू घेऊन येणारा ट्रक (क्र. एमएच-२० सीटी-४४२२) औरंगाबाद शहराच्या दिशेने चालला होता. औरंगाबाद- बीड या राष्ट्रीय महामार्गावरील भालगाव फाट्याजवळ रात्री ८.३० वाजेच्या सुमारास सदरील भरधाव ट्रकने समोरून येणार्या मोटारसायकलला जोराची धडक दिली. या अपघातात मोटारसायकलस्वार शेषराव विनायक घोरपडे हे ट्रकच्या चाकाखाली आले. त्यांच्या दोन्ही पायांचा चुरा झाला. या अपघाताची माहिती मिळताच चिकलठाणा पोलीस ठाण्याचे जमादार शेख शकील, सुनील गोरे व काही नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेतली. जखमी शेषराव घोरपडे यांना तात्काळ घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. वैद्यकीय अधिकार्यांनी तपासून त्यांना मयत घोषित केले. या प्रकरणी चिकलठाणा ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, घटनास्थळाचे दृश्य एवढे विदारक होते की, अपघात झाल्यानंतर वाळूने भरलेला ट्रक रस्त्याच्या कडेला शेतात जाऊन उलटला. अंधाराचा फायदा घेत ट्रकचालक तेथून पळून गेला. रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता. रात्रीची वेळ असल्यामुळे पोलीस व नागरिकांना मदत करण्यास मोठी अडचण जात होती.