वाळूच्या ट्रकने वृद्ध महिलेला चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 01:00 AM2017-09-26T01:00:20+5:302017-09-26T01:00:20+5:30
नवरात्रोत्सवानिमित्त कर्णपुरा देवीच्या दर्शनासाठी पायी निघालेल्या महिलेला वाळूच्या भरधाव ट्रकने चिरडले.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : नवरात्रोत्सवानिमित्त कर्णपुरा देवीच्या दर्शनासाठी पायी निघालेल्या महिलेला वाळूच्या भरधाव ट्रकने चिरडले. हा भीषण अपघात सोमवारी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास कोकणवाडीतील अहिल्यादेवी होळकर चौकात झाला.
लालमती रामआशिष पासवान (५०, रा. उस्मानपुरा येथील गुरुद्वारामागे) असे अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, नवरात्रोत्सवानिमित्त कर्णपुरा येथे देवीची यात्रा भरली आहे. नवरात्रोत्सवातील नऊ दिवस भाविक देवीच्या दर्शनाठी गर्दी करतात. विशेषत: भल्या पहाटे दर्शनासाठी पायी जाणा-या भाविकांची संख्या अधिक आहे. सोमवारी पहाटे ४.३० वाजेच्या सुमारास लालमती पासवान या नातेवाईकांसह दर्शनासाठी पायी निघाल्या होत्या. कोकणवाडी चौकात रस्ता ओलांडत असतानाच एक वाहन वेगात येत असल्याचे पाहून त्या परत फिरल्या व वेगात आलेल्या ट्रकने (एमएच-०४-३३५१) त्यांना चिरडले. हा अपघात एवढा भीषण होता की, लालमती यांच्या डोक्याला जबर मार लागून त्या रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या आणि बेशुद्ध पडल्या. अपघाताची माहिती मिळताच वेदांतनगर पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी आणि वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या लालमती यांना तात्काळ घाटीत दाखल करण्यात आले.
अपघात विभागातील डॉक्टरांनी लालमती यांना तपासून मृत घोषित केले. वेदांतनगर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली. ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची प्रक्रि या सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
मृत लालमती यांचे कुटुंब अनेक वर्षांपासून शहरात स्थायिक आहे. त्यांचे पती बांधकाम व्यावसायिक आहेत. त्याच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे.