वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यातच रुग्णांवर होणार प्रथमोचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 11:06 PM2019-07-01T23:06:03+5:302019-07-01T23:23:15+5:30
जानकीदेवी बजाज संस्थेच्या पुढाकाराने वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात उभारलेल्या आरोग्य केंद्राचे सोमवारी पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
वाळूज महानगर : अपघातातील जखमींना तात्त्काळ प्रथमोचार मिळावेत, यासाठी व त्यांचा जीव वाचावा यासाठी जानकीदेवी बजाज संस्थेच्या पुढाकाराने वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात उभारलेल्या आरोग्य केंद्राचे सोमवारी पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात अपघाताच्या घटना घडतात. यातील जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करावे लागते. यात बराच वेळ जातो व जखमींना तात्काळ उपचार मिळत नाहीत. वेळेवर उपचार न मिळाल्याने अनेक रुग्ण दगावल्याच्या घटना घडल्या आहेत. ही बाब लक्षात घेवून पोलीस आयुक्त कार्यालय व वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या वतीने बजाज अॅटो यांच्याकडे पोलीस ठाण्यात आरोग्य केंद्र व जनहित हॉल बांधून देण्याची विनंती केली होती.
या अनुषंगाने जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेने या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र व जनहित हॉल बांधून दिला आहे. या आरोग्य केंद्राचे व जनहित हॉलचे पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्या हस्ते सोमवारी सकाळी उद्घाटन करण्यात आले. यावेळी पोलीस ठाणे परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले.
कार्यक्रमाला जानकीदेवी बजाज संस्थेचे सी.पी. त्रिपाठी, पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे-पाटील, पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड, सुनिता तगारे, पाटील, वाहतूक शाखेचे निरीक्षक उदार, फौजदार राहुल रोडे, लक्ष्मण उंबरे, सतिश पंडित, प्रशांत गंभीरराव, विठ्ठल चासकर, राजेंद्र बांगर, स.फौजदार राजू मोरे, राजेश वाघ, रमाकांत पठारे, अन्वर शेख, संजय हंबीर, प्रकाश गर्जे, महेश कोमटवार, सुनिता भवरे आदींची उपस्थिती होती.