शहरातील चंदनाचे लाकूड जाते कर्नाटक आणि अमरावतीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:33 AM2020-12-17T04:33:04+5:302020-12-17T04:33:04+5:30
गेल्या काही वर्षापासून तस्कर वेगवेगळ्या वसाहती आणि शासकीय कार्यालये, अधिकाऱ्यांच्या बंगल्याच्या आवारातील चंदनाच्या झाडांना लक्ष करीत आहेत. औरंगाबाद तालुक्यातील ...
गेल्या काही वर्षापासून तस्कर वेगवेगळ्या वसाहती आणि शासकीय कार्यालये, अधिकाऱ्यांच्या बंगल्याच्या आवारातील चंदनाच्या झाडांना लक्ष करीत आहेत. औरंगाबाद तालुक्यातील आडगाव माऊली येथील काही लोक यात गुंतलेले आहेत. लाकूड तोडण्यात तरबेज असलेले येथील चंदन तस्कर बॅटरीवर चालणाऱ्या कटरच्या साहाय्याने अवघ्या पाच ते पंधरा मिनिटात २५ वर्ष जुने झाड आडवे करून तुकडे तुकडे करतात. काळ्या बाजारात चंदनाच्या खोडातील गाभ्याला सर्वोत्तम भाव मिळत असल्यामुळे तस्कर जास्तीत जास्त जुने आणि जाड बुंध्याचे झाड तोडून खोड कापून नेतात. जवाहरनगर, पुंडलिकनगर आणि सिटी चौक पोलिसांनी चंदन तस्करांना अटक केली होती. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार कर्नाटक राज्यात चंदनापासून अगरबत्ती, साबण, अत्तर आणि अन्य वस्तू तयार करणारे कारखाने आहेत. शिवाय अमरावती येथील काही आरा मशिनवाले चोरट्या मार्गाने चंदन खरेदी करतात. विविध उद्योगात चंदनाला असलेली मागणी जास्त आहे. मात्र चंदनाचा तुटवडा असल्यामुळे त्याला चढता दर मिळतो. यामुळे चंदन चोरी करणाऱ्याकडून मोठे तस्कर चंदन लाकूड खरेदी करुन कर्नाटक आणि अमरावती येथे चोरट्या मार्गाने विक्रीसाठी नेतात.
================
चौकट
कार, भाजीपाला वाहतूक करणाऱ्या वाहनातून तस्करी
वन विभागाच्या परवानगीशिवाय चंदनाचे झाड तोडणे आणि वाहतूक करण्यास मनाई आहे. चोरट्या मार्गाने चंदन तस्कर झाडे चोरून नेतात. तीन वर्षात सुमारे ४० झाडे चोरट्यांनी पळविली. त्याची वाहतूक कार अथवा भाजीपाला वाहतूक करणाऱ्या वाहनातून होते. चंदनाच्या लाकडाचे अत्यंत लहान तुकडे करून ही वाहतूक केली जाते.
===================
रेकी करून चंदन चोरी
शहरातील आणि शेतकऱ्यांच्या बांधावरील तसेच जंगलात चंदनाचे झाड कुठे आहेत, याबाबत चोरटे दिवसभर रेकी करतात. रात्रीच्या अंधारात पोलिसांची नजर चुकवून आणि कारवाईला न घाबरता चंदन चोरी करून हजारो रुपये कमाई करतात.