संदीप क्षीरसागरांचा कल राष्ट्रवादीकडेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2017 12:41 AM2017-02-27T00:41:04+5:302017-02-27T00:41:37+5:30
बीड जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत तीनच पण निर्णायक संख्याबळ पटकावलेल्या काकू- नाना आघाडीचा टेकू राष्ट्रवादी काँग्रेसलाच मिळेल हे आता स्पष्ट होऊ लागले आहे.
प्रताप नलावडे बीड
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत तीनच पण निर्णायक संख्याबळ पटकावलेल्या काकू- नाना आघाडीचा टेकू राष्ट्रवादी काँग्रेसलाच मिळेल हे आता स्पष्ट होऊ लागले आहे. आघाडीचे प्रमुख संदीप क्षीरसागर यांनी घड्याळासह स्वत:ची छायाचित्रे सोशल मीडियावर पोस्ट करुन याला पुष्टीच दिली आहे. उल्लेखनीय म्हणजे ‘स्वत:चा रस्ता स्वत:च तयार करा...’ असा सूचक संदेश लिहून त्यांनी बारामतीचा ‘राजमार्ग’ स्वत:साठी सुरक्षित केला आहे. त्यामुळे काका आ. जयदत्त क्षीरसागर यांच्यावर कुरघोडी करतानाच त्यांनी भाजपलाही धोक्याचा इशारा दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्याशी मतभेद झाल्यानंतर पुतणे संदीप क्षीरसागर यांनी ‘काकू - नाना आघाडी’ची मुहूर्तमेढ रोवून स्वतंत्र चूल मांडली. पालिका निवडणुकीतही संदीप क्षीरसागर यांनी दोन्ही काकांची पुरती कोंडी केली.
जि.प., पं. स. निवडणुकीतही त्यांनी आघाडीचा ‘फॉर्म्यूला’ कायम ठेवला. आ. जयदत्त क्षीरसागर व डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी प्रतिष्ठा पणाला लावूनही राकॉला तालुक्यात केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. दुसरीकडे संदीप यांनी स्वत:सह मातोश्री सुरेखा क्षीरसागर व केशरबाई घुमरे अशा तीन जागा जिंकून ग्रामीण भागातही पकड घट्ट केली.
सर्वाधिक २५ जागा पटकावून राष्ट्रवादी क्रमांक १ चा पक्ष ठरला. मात्र, काँग्रेसचे तीन सदस्य सोबत आले तरीही सत्तास्थापनेकरता राकॉला तीन जागा कमीच पडतात. आ. विनायक मेटे यांच्याकडे चार सदस्य आहेत; पण ते भाजपच्या कोट्यातून विधानपरिषदेवर पोहोचले आहेत.
शिवसेनेत दाखल झालेले माजीमंत्री बदामराव पंडित यांनीही चार जागा पटकावल्या. मात्र, हे दोन्ही नेते जि.प. मध्ये राकॉला रसद पुरविण्याची शक्यता कमीच आहे. राकॉशी बंड केलेल्या संदीप क्षीरसागरांकडे निर्णायक संख्याबळ आहे. त्यांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केली नाही; पण महाशिवारात्रीनिमित्त शुभेच्छा देताना सोशल मीडियावर त्यांनी स्वत:च्या छायाचित्रासोबत राकॉचे निवडणूक चिन्ह असलेल्या घड्याळाचेही दर्शन घडविले आहे. त्यानंतर दोन दिवसांपासून त्यांची आणखी एक ‘पोस्ट’ झळकत आहे. ‘रस्ता सापडत नसेल तर... स्वत:चा रस्ता स्वत:च तयार करा..’ असा त्यात सूचक संदेश आहे. हा संदेश आगामी रणनीतीविषयी बरेच काही सांगून जातो.
आ. क्षीरसागर यांच्यावर जि.प. निवडणुकीत मात केल्यानंतर संदीप क्षीरसागर यांची आगामी रणनीती काय ? याबाबत तर्कवितर्क आहेत. मात्र, स्वबळाची ताकद दाखविल्यानंतर त्यांनी स्वत:च्या छायाचित्रांसोबत घड्याळ कायम ठेवून आश्चर्याचा धक्का दिला आहे. त्यामुळे राकॉतील दुहीचा फायदा उठवू पाहणाऱ्या भाजपसाठीही संदीप क्षीरसागरांचा हा नवा डाव धोक्याची ‘टिकटिक’ ठरत आहे.