'भुमरे मैदानात यावेत; वाटच बघतोय !';छत्रपती संभाजीनगरात विरोधकांच्या भात्यातील बाण कोणते?
By विकास राऊत | Published: April 10, 2024 05:28 PM2024-04-10T17:28:50+5:302024-04-10T17:30:13+5:30
आमच्या टीकेला उत्तर देताना भुमरेंच्या नाकीनऊ येतील, असा दावा त्यांचे विरोधक करत आहेत.
छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून शिंदेसेनेचेे मंत्री संदीपान भुमरे यांनी मैदानात उतरण्याची तयारी केली असली तरी त्यांच्यासाठी ही निवडणूक सोपी असणार नाही. दारूची दुकाने, एमआयडीसीतील भूखंड, रोहयो कामातील व्यवहार अशा अनेक आरोपांचे तोफगोळे विरोधकांनी तयार ठेवले आहेत. आमच्या टीकेला उत्तर देताना भुमरेंच्या नाकीनऊ येतील, असा दावा त्यांचे विरोधक करत आहेत.
औरंगाबादच्या जागेचा तिढा अजून सुटलेला नाही. ही जागा शिंदेसेनेकडेच असून आम्हीच ती लढवणार आहोत, असा दावा सातत्याने आ. संजय शिरसाट करत आहेत. रोहयो आणि फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे हे तर उमेदवारी मिळाल्याच्या आविर्भावात कामालादेखील लागले आहेत. परवाच त्यांनी महायुतीतील घटक पक्षांच्या नेत्यांची बैठक घेऊन प्रचाराचे नियोजन केले, तर दुसरीकडे भुमरे मैदानात यावेत, याची विरोधक जणू वाटच पाहत आहेत. मंगळवारी एका वाहिनीच्या कार्यक्रमात त्याची चुणूक दिसून आली. काहींनी भुमरे यांना दारूच्या दुकानांवरून टीकेचे लक्ष्य केले. शिंदेसेनेला जागा सुटली आणि भुमरे हेच उमेदवार राहिले तर यावेळची निवडणूक रंगतदार होईल. महायुती, महाविकास आघाडी, एमआयएम आणि अपक्ष अशी चौरंगी लढत मतदारसंघात होण्याचे संकेत सध्या आहेत.
विरोधकांच्या भात्यातील बाण
भुमरे हे जिल्ह्यातील असले तरी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील नाहीत. त्यांची जिल्ह्यात मद्याची अनेक दुकाने आहेत. डीपीसीत
निधीवरून वादावादी का झाली?
रोहयोतील कामे कशी मंजूर केली जातात? एमआयडीसीतील भूखंडावरील आरक्षण उठविण्यासाठी कोणी पत्र दिले? पैठणमधील ब्रह्मगव्हाण उपसा जलसिंचन योजनेचे काय झाले? अशा आरोपांची जंत्रीच विरोधकांनी तयार ठेवली असल्याचे समजते.
निवडणुकीत परिणाम दिसतील....
भुमरे यांच्या कुटुंबीयांच्या मालकीची किती दारू दुकाने आहेत? रोहयो खात्यात त्यांना खूप काम करण्याची संधी होती, पण प्रत्येक कामांची ऑर्डर टक्केवारीतून निघते. पैठण मतदारसंघात अजून पाणी मिळाले नाही, ते संभाजीनगरला पाणी कधी देणार असा प्रश्न आहे. ब्रह्मगव्हाण योजनेची वाट लावली आहे.
- बद्रीनारायण भुमरे, पैठण.
आम्ही तर वाटच पाहून आहोत....
भुमरे यांचा विधानसभा मतदारसंघ औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात नाही. या मतदारसंघात त्यांचे काहीही काम नाही. प्रत्येक कामात टक्केवारी घेत असल्याची चर्चा आहे. मैदानात येऊ देत, आम्ही तर वाटच पाहून आहोत.
-दत्ता गोर्डे, उपजिल्हाप्रमुख, उद्धवसेना.
घोडामैदान जवळच आहे..
भुमरेंना उमेदवारी तर मिळू द्या, मग बघू, त्यांना निपटणे सोपे काम आहे. आमची पूर्ण तयारी आहे. घोडामैदान जवळ आहे.
-अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते
आधी निर्णय तर होऊ द्या...
जागा कुणाला सुटते, हेच अजून ठरलेले नाही. क्रांती चौकातील एका जाहीर कार्यक्रमात तर नागरिकही भुमरे यांच्यावर टीका करीत होते. आधी त्यांनी उमेदवारी मिळू द्या, मग बघू काय करायचे.
-इम्तियाज जलील, खासदार, एमआयएम.
विरोधक हादरले आहेत
लोकसभेसाठी माझ्या नावाची चर्चा सुरू होताच विरोधक हादरले. त्यामुळे आरोप सुरू झाले आहेत. यापूर्वीही अनेक आरोप झाले आहेत. परंतु, काहीही सिद्ध झालेले नाही. उमेदवारी मिळाली तर अर्ज भरताना सगळे काही समोर येईलच.
- संदीपान भूमरे, पालकमंत्री