सुपुत्रासाठी संदीपान भुमरेंची जादू चालली अन् अनेकांचे अंदाज चुकले; सहाव्यांदा आमदारकी घरात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2024 05:23 PM2024-11-24T17:23:11+5:302024-11-24T17:24:01+5:30
दोन्ही उमेदवारांनी जोरदार प्रचार यंत्रणा राबविली; मात्र विलास भुमरेंनी पहिल्या फेरीपासूनच घेतली आघाडी
पैठण : पैठण विधानसभा मतदारसंघात अद्यापही आपली जादू कायम असल्याचे खा. संदीपान भुमरे यांनी दाखवून देत सहाव्यांदा आमदारकी आपल्या घरात खेचून आणली. या मतदारसंघातील भुमरे यांचे पुत्र विलास भुमरे यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेत विजयी लक्ष्य साध्य केले.
पैठण विधानसभा मतदारसंघात १९९० पासून झालेल्या ७ पैकी ६ निवडणुकांमध्ये शिवसेनेने विजय मिळविला असून त्यात तब्बल ५ वेळा संदीपान भुमरे यांनी विजय संपादन केला आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत संदीपान भुमरे यांनी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून विजय संपादन केल्याने यावेळच्या विधानसभा निवडणुकीत शिंदे सेनेकडून त्यांचे पुत्र विलास भुमरे यांना उमेदवारी मिळाली. २०१९ मध्ये खा. भुमरे यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविलेले दत्तात्रय गोर्डे यावेळी उद्धव सेनेकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. या मतदारसंघात १७ उमेदवार रिंगणात होते; परंतु खरी लढत दोन सेनेतच सरळ लढत झाली. दोन्ही उमेदवारांनी जोरदार प्रचार यंत्रणा राबविली.
यावेळी विलास भुमरे यांनी वडील संदीपान भुमरे यांनी केलेली विकास कामे प्रचारातून मांडली तर गोर्डे यांनी भुमरे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. तसेच त्यांची तालुक्यात दहशत असल्याचे सांगून वैयक्तिक आरोप केले. मतदानाच्या काही दिवस अगोदर एका घटनेत विलास भुमरे जखमी झाले. त्यामुळे ते छत्रपती संभाजीनगर येथील एका खासगी दवाखान्यात उपचार घेत असताना त्यांच्या प्रचाराची संपूर्ण धुरा त्यांचे वडील खासदार संदीपान भुमरे यांनी आपल्या खांद्यावर घेतली. त्यांनीही मतदारांना आपण गेल्या ५ टर्ममध्ये मतदारसंघात केलेली विकास कामे आपल्या भाषणातून सांगितली. तर उद्धवसेनेचे उमेदवार दत्तात्रय गोर्डे यांनी भुमरे यांच्यावरील आरोपांच्या फैरी चालूच ठेवल्या. ही बाब मतदारांना पटली नसल्याचे निवडणूक निकालातून दिसून आले. कारण, मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून शेवटच्या फेरीपर्यंत महायुतीचे उमेदवार विलास संदीपान भुमरे हे आघाडीवर होते. त्यांची आघाडी शेवटपर्यंत कायम राहिली व गोर्डे यांचा विलास भुमरे यांनी २९ हजार १९२ मतांनी पराभव केला. विशेष म्हणजे भुमरे यांच्या प्रचारासाठी एकही स्टार प्रचारक मतदारसंघात आला नसताना त्यांचे वडील खासदार संदीपान भुमरे यांनीच स्टार प्रचारकाची भूमिका निभावून कॉर्नर बैठका, पदयात्रा, जाहीर सभा घेतल्या. त्याचा त्यांना लाभ झाला.