संदीपान भुमरेंची भाजपसोबत पहिल्यांदाच चाय पे चर्चा; प्रचार कार्यालय, निवडणुकीवर मंथन
By विकास राऊत | Published: April 6, 2024 12:24 PM2024-04-06T12:24:53+5:302024-04-08T19:10:54+5:30
पालकमंत्री संदिपान भुमरे निमंत्रणावर भाजपने त्यांच्या कार्यालयात जाऊन ‘चाय पे चर्चा’ केल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
छत्रपती संभाजीनगर : पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी शुक्रवारी पहिल्यांदाच भाजपच्या मंत्र्यांना आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना चहासाठी कार्यालयात बोलविले हाेते. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही. शिंदेसेना आणि भाजपमध्ये जागेसाठी रोज बैठकांचे सत्र सुरू असताना, पालकमंत्र्यांच्या निमंत्रणावर भाजपने त्यांच्या कार्यालयात जाऊन ‘चाय पे चर्चा’ केल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. चर्चेमध्ये भुमरे यांंनी जागा कुणालाही सुटो महायुतीचा उमेदवार निवडून आणण्याचे आवाहन केले. तसेच, प्रचार कार्यालयासाठी मोंढा नाका येथील जागा देखील शोधली असल्याचे भाजप नेत्यांना सांगितले. चर्चेअंती ही सगळी तयारी पाहता भाजप नेत्यांचे अवसान गळाले. नेमके काय चालले आहे, जागा शिंदेसेनेला गेल्याप्रमाणेच चर्चेचा सगळा नूर पाहता भाजप नेत्यांनी उपमुख्यमंत्र्यांना एसएमएस पाठविले.
पालकमंत्री भुमरे आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर, शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांच्यात महायुती म्हणून पहिलीच बैठक शुक्रवारी झाली. त्या बैठकीनंतर भाजप संभ्रमात असून, पुढील एक-दोन दिवसांत काय होणार याकडे त्यांचे लक्ष आहे. मराठवाड्यातील आठपैकी सात जागांचा वाटप झाला आहे. यात २ जागा रा.काँ.पा. (अजित पवार) पक्षाला, ४ जागा भाजपला, तर १ जागा शिंदेसेनेला गेली आहे. औरंगाबाद मतदारसंघाचा निर्णय अद्याप बाकी आहे.
उपमुख्यमंत्र्यांना पाठविले एसएमएस...
राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर यांच्या मोबाइलवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जागा भाजपला सुटावी, असा एसएमएस पाठविण्यात आला. त्यांचा रिप्लाय काय आला हे काही भाजपच्या गोटातून अद्याप समजले नाही, परंतु जागा वाटप अद्याप झालेले नाही. जागा भाजपलाच सुटेल, असा विश्वास भाजप नेत्यांना आहे.
केणेकर यांचा घरचा आहेर...
भाजप औरंगाबाद मतदारसंघ घेण्यासाठी जोरदार मागणी करीत आहे. त्यामुळे जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. अशी परिस्थिती असताना ४ एप्रिल रोजी प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर यांनीच शिंदेसेनेकडून आ. संजय शिरसाट यांना उमेदवारी देण्याचा सल्ला देत भाजपलाच घरचा आहेर दिला. आ. शिरसाट यांनी दोन दिवसांत उमेदवारीचा निर्णय होईल. आमचा उमेदवारही ठरल्याचे नमूद केले, परंतु केणेकर यांच्या या सल्ल्यावरून स्थानिक नेत्यांनी त्यांच्यावर शुक्रवारी नाराजी व्यक्त केली. पालकमंत्री भुमरे हे उमेदवार असल्याची कुणकुण, तर केणेकर यांना लागली नसावी ना, त्यामुळेच त्यांनी आ. शिरसाट यांना दिल्लीसाठी शुभेच्छा दिल्याची चर्चा आहे.
निर्णय वरिष्ठ घेतील...
आज भाजपच्या सर्वांना निमंत्रित केले होते. महायुती आणि पालकमंत्री म्हणून माझी जबाबदारी आहे. मुंबईत अनेक बैठका झाल्या. उमेदवार एकजुटीने निवडून आणण्यासाठी शहरात पहिल्यांदाच बैठक घेतली. महायुतीचा उमेदवार येथून निवडून आणू. उमेदवार कोण असेल हे पक्ष ठरवेल. माझ्या नावाची चर्चा असली, तरी जो निर्णय होईल तो वरिष्ठ नेते घेतील.
- संदिपान भुमरे, पालकमंत्री
कार्यालयापासून सर्व तयारी...
भाजपने कार्यालयापासून प्रचार नियाेजनाची पूर्ण तयारी केलेली आहे. जागा भाजपलाच सुटेल, ही अपेक्षा कायम असून, एक-दोन दिवसांत निर्णय होईल. पालकमंत्री भुमरे यांनी महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी एकत्रित बैठक घेतली. जागा कुणालाही सुटली, तरी महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी बैठकीत चर्चा झाली.
- शिरीष बोराळकर, शहराध्यक्ष भाजप
मराठवाड्यातील जागावाटपाची वस्तुस्थिती
औरंगाबाद - निर्णय नाही
जालना - भाजप
परभणी - रा.काँ.पा. (अजित पवार)
नांदेड - भाजप
उस्मानाबाद - रा.काँ.पा. (अजित पवार)
लातूर - भाजप
हिंगोली - शिंदेसेना
बीड - भाजप