आंबेगावात पकडलेला वाळूचा ट्रक चालकाने पळविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 09:54 PM2018-12-20T21:54:02+5:302018-12-20T21:54:14+5:30
वाळूची चोरटी वाहतूक करताना आंबेगाव पकडलेला ट्रक पळवून नेणाऱ्या चालक व मालकांविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाळूज महानगर: वाळूची चोरटी वाहतूक करताना आंबेगाव पकडलेला ट्रक पळवून नेणाऱ्या चालक व मालकांविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आंबेगावजवळ तलाठी अरुणा बन्सोडे यांनी १५ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास वाळूने भरलेला हायवा ट्रक (एम.एच.२०, सी.टी.६३८४) अडविला. चालकाकडे परवाना व रायल्टीच्या कागदपत्राची मागणी केली. त्याने कागदपत्रे सोबत नसल्याचे सांगितले. तसेच आसेगाव परिसरातून वाळू ट्रकमध्ये भरल्याचे सांगत स्वत:चे नाव सांगण्यास नकार दिला.
सदर हायवा मालकाचे नाव अमोल जगताप (रा.गंगापूर) असल्याचे सांगत त्याने ट्रक साईडला घेण्याने नाटक करुन हा ट्रक सुसाट वेगाने पळवून नेला. त्यामुळे तलाठी बन्सोडे यांनी पंचाना बोलावून पंचनामा करीत या प्रकाराची माहिती गंगापूरचे तहसीलदार डॉ.अरुण जºहाड यांना दिली. पाच दिवसांपासून या हायवाचा शोध महसूल विभागाचे पथक घेत असून हायवा न मिळाल्यामुळे गुरुवारी तलाठी बन्सोडे यांनी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरुन फरार हायवा चालक व मालक अमोल जगताप या दोघाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.