निराधार योजनेचा बट्ट्याबोळ; पैसे असूनही लाभार्थी वंचित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 04:29 PM2018-09-15T16:29:21+5:302018-09-15T16:33:59+5:30

संजय गांधी निराधार योजनेचा बट्ट्याबोळ झाला असून, खात्यात पैसे असूनही शेकडो लाभार्थी लाभापासून वंचित राहत आहेत.

Sanjay Gandhi Niradhar a False plan; Despite the money the beneficiary is deprived! | निराधार योजनेचा बट्ट्याबोळ; पैसे असूनही लाभार्थी वंचित!

निराधार योजनेचा बट्ट्याबोळ; पैसे असूनही लाभार्थी वंचित!

googlenewsNext

- स.सो. खंडाळकर  

औरंगाबाद : युती शासनाच्या काळात संजय गांधी निराधार योजनेचा बट्ट्याबोळ झाला असून, खात्यात पैसे असूनही शेकडो लाभार्थी लाभापासून वंचित राहत आहेत. यात वयोवृद्ध लाभार्थ्यांचे कंबरडे रोज रोज बँकेत जाऊन व बँकेने टोलवाटोलवी केली की, पुन्हा संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयात चकरा मारून मारून मोडत आहे. 

‘अकाऊंट ब्लॉकड्’ असे शेरे मारलेले कागद हातात घेऊन हे लाभार्थी जिल्हाधिकारी कार्यालयातील आधार भवनात रोजच येत आहेत. याच आधार भवनात संजय गांधी निराधार योजनेचे कार्यालय आहे. तेथे कर्मचाऱ्यांची प्रचंड वानवा आहे. पूर्णवेळ  तहसीलदार नाही.  सतत बैठका होण्याचा सिलसिला नाही.  

पासबुकही देत नाहीत... 
सुमारे चार हजार लाभार्थ्यांना बँक पासबुकच द्यायला तयार नसल्याची धक्कादायक माहिती ऐकावयास मिळाली. ३० लाभार्थ्यांच्या खात्यात त्यांच्या मानधनाचे पैसे जमा आहेत; परंतु येनकेनप्रकारेण बँक द्यायला तयार नसल्याने अनेक लाभार्थी या लाभापासून गेले नऊ महिन्यांपासून वंचित आहेत. ‘अब मरने को आ गये. तोभी पैसे नहीं मिल रहे है,’ अशा शब्दात आपला संताप एका लाभार्थ्याने व्यक्त केला. 

जिथे काम जास्त तेथेच कर्मचारी कमी
स्वत: जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी या प्रश्नात लक्ष घालण्याची गरज आहे. बँकेतून काही अडवणूक होत असेल तर बँक अधिकाऱ्यांची बैठक बोलावली पाहिजे, संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयानेच असा कोणता गुन्हा केला आहे की, येथे पुरेसे कर्मचारी नाहीत. जिथे काम जास्त आहे, जे काम आशीर्वाद घेण्याचे आहे, माणुसकीचे आहे, निराधारांना आधार देण्याचे आहे, तेथे कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या! हेच का ते पारदर्शक व सक्षम प्रशासन? असा सवाल उपस्थित होत आहे. 

पेट्रोलचे भाव रोज वाढत आहेत. आॅटोने येणे-जाणे परवडत नाही. घरून पायीच निघतो आणि कधी बँकेत तर कधी आधार भवनात चकरा मारून जाण्यातच आमचा दिवस जातो; पण काम काही होत नाही, असे एकाआजीबाईने सांगितले. या निराधारांना न्याय मिळाला नाही तर त्यांना सोबत घेऊन आपण आता बेमुदत उपोषणास बसणार आहोत, अशी घोषणा समितीचे माजी अध्यक्ष तकी हसन खान यांनी केली आहे.

Web Title: Sanjay Gandhi Niradhar a False plan; Despite the money the beneficiary is deprived!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.