संजय राठोड राजीनामा द्या; भाजपा महिला मोर्चाचे जालना रोडवर आक्रमक आंदोलन, रास्तारोकोचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 01:48 PM2021-02-27T13:48:30+5:302021-02-27T13:50:02+5:30
जालना रस्ता अडवणाऱ्या आंदोलकांना क्रांतीचाैक पोलीसांनी घेतले ताब्यात
औरंगाबाद : तिघाडी सरकार हाय...हाय, राजीनामा द्या...राजीनामा द्या...संजय राठोड राजीनामा द्या, आघाडी सरकारचे करायचे काय खाली मुंडके वर पाय अशा घोषणा देत भाजपा महिला मोर्चाने शनिवारी दुध डेअरी सिग्नल येथे आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी जालना रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला. त्या आंदोलकांना ताब्यात घेत पोलीस व्हॅनमधून बसवून क्रांतीचाैक पोलीस ठाण्यात नेले.
महिला मोर्चा शहर अध्यक्ष अमृता पालोदकर, लता दलाल, अर्चना नीलकंठ, श्वेता जैस्वाल, रुपाली वाहुले, सुप्रिया चव्हाण, मनीषा भन्साळी, आशा जोशी, मीना खरे, जानवी पाटील, शहर जिल्हा अध्यक्ष संजय केनेकर, राजेश मेहता, संजय जोशी, जालिंदर शेंडगे, प्रवीण कुलकर्णी, सिद्धार्थ साळवे, मुकेश बिरुटे, समीर राजूरकर, दिपक ढाकणे, युवा मोर्चाचे महेश राऊत, पंकज साकला, प्रथमेश दुधगावकर आदींसह कार्यकर्त्यांची यावेळी उपस्थिती होती. तर पोलीसांचाही मोठा फाैजफाटा उपस्थित होता.
सकाळी दहा वाजेपासून पोलीसांचा कडेकोट बंदोबस्त असतांना भाजपाचे पदाधिकारी आंदोलक जमत होते. अकरा वाजेच्या सुमारास महिला पदाधिकार्यांनी बॅनर हातात घेवून आंदोलनाला सुरुवात केली. महिला पोलीस अधिकार्यांनी आंदोलकांनी जालना रस्तावर येवून वाहतुकीला अडथळा करु नये म्हणून त्यांना थोपवून धरले. काही महिलांनी रस्त्यावर झोपण्याचा प्रयत्न केला. त्यांना पोलीस वाहनात ओढून नेण्यात आले. त्यानंतर पुन्हा प्रमुख पदाधिकारी रस्ता अडवण्याचा प्रयत्न करत असतांना त्यांनीही दुसऱ्या पोलीस वाहनात महिला पोलीसांनी बसवले. तर काही महिला तिसऱ्या वाहनात जावून बसल्या. त्यानंतर भाजप शहराध्यक्ष संजय केणेकर यांनी माध्यमांशी संवाद साधल्यावर ते पोलीस व्हॅनमध्ये बसले. तिन्ही वाहने क्रांतीचाैक पोलीस ठाण्यात नेण्यात आले. तिथेही महिलांनी सरकार विरोधात घोषणाबाजी केली.
भाजपा आवाज उठवत राहील
माध्यमांशी बोलतांना केणेकर म्हणाले, पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात नाव आलेल्या आघाडी सरकारमधील मंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिला पाहीजे. त्यांनी पोलीसांच्या चाैकशीला सामोरे जावे. अशी आमची मागणी आहे. बलात्कार्यांना आश्रय देणार्या सरकारचा निषेध करण्यासाठी भाजपाच्या महिला मोर्चा रस्त्यावर उतरल्या. पोलीस, सरकार कोरोनाच्या नावाखाली आंदोलने दडपत आहे. भ्रष्ट्राचार, बलात्काराच्या विरोधातील उठणारा आवाज सरकारकडून दाबल्या जात आहे. पण भाजपा याविरोधात आवाज उठवत राहील.