Sanjay Shirsat: खैरेंचा सत्कार करताच संजय शिरसाट निघाले, खा. जलिल यांनी हात धरुन थांबवले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2022 04:49 PM2022-08-28T16:49:36+5:302022-08-28T16:52:54+5:30
औरंगाबादेत शांतता समिती बैठक सुरू होण्यापूर्वी झालेल्या सूत्रसंचालनात आ. संजय शिरसाठ यांच्या आधी चंद्रकांत खैरे यांचे सत्कारासाठी नाव उच्चारल्यावर शिरसाठ यांनी हरकत घेत हा राजशिष्टाचार नसल्याची आठवण पोलिसांना करून दिली
औरंगाबाद : गणेशोत्सव निर्बंधमुक्त, शिस्तीत उत्साहात साजरा करण्यासाठी आयोजित शांतता समिती बैठक समन्वय बैठक म्हणून घेण्यात आली. मात्र, नेत्यांच्या मानापमान नाट्यात प्रशासनाची कोंडी झाली. कोपरखळ्यांनी एकच हशा पिकला. अडचणी सांगा, २४ तासांत सोडवू, गणेशोत्सव शिस्तीत, आनंदात पार पाडण्यासाठी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी केले. मात्र, यावेळी माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा सत्कार अगोदर केल्याने आमदार संजय शिरसाट नाराज झाले. चालू कार्यक्रमातून त्यांनी काढता पाय घेतला होता. मात्र, एमआयएमच्या खासदार इम्तियाज जलील यांनी त्यांचा हात धरला.
औरंगाबादेत शांतता समिती बैठक सुरू होण्यापूर्वी झालेल्या सूत्रसंचालनात आ. संजय शिरसाठ यांच्या आधी चंद्रकांत खैरे यांचे सत्कारासाठी नाव उच्चारल्यावर शिरसाठ यांनी हरकत घेत हा राजशिष्टाचार नसल्याची आठवण पोलिसांना करून दिली. यावेळी बैठकीतून निघून जाण्याचा पवित्रा घेतला. मात्र, मंत्री सावे, डॉ. भागवत कराड, खा. इम्तियाज जलील, आ. प्रदीप जैस्वाल यांनी त्यांना शांत केले. त्यामुळे, ते पुन्हा खुर्चीवर बसले. या कार्यक्रमातील सुत्रसंचालनात चुका वाढत गेल्याने पोलीस आयुक्तही तापले होते.
पोलीस आयुक्तालयाच्या वतीने आयोजित सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची बैठक संत एकनाथ रंगमंदिरात शनिवारी पार पडली. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्राधान्य देण्याचे आवाहन मनपा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले. आ. संजय शिरसाठ म्हणाले, गणेश मंडळांना क्रांती चौकातून मिरवणुकीत येऊ द्या. छावणीच्या दुसऱ्या दिवशीच्या मिरवणुकीला दोन तासांचा वेळ वाढवून द्या.
काय म्हणाले खैरे
शिवसेना नेते चंद्रकांत खैरे म्हणाले, गणेशोत्सवात राजकारण बाजूला ठेवून गणेशोत्सव उत्साहात साजरा करा. आ. प्रदीप जैस्वाल म्हणाले, सध्या दीड वाजेपर्यंत मोबाइल शॉपी का सुरू राहतात, त्याकडे लक्ष द्या. महासंघाचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार, अध्यक्ष विजय औताडे, माजी आ. किशनचंद तनवाणी, माजी महापौर नंदकुमार घोडेले, पोलीस उपायुक्त अपर्णा गिते, उज्ज्वला वनकर, दीपक गिऱ्हे, मनपा उपायुक्त रवींद्र निकम, अपर्णा थेटे, निखिल कुलकर्णी, सागर शेलार आदींसह मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
पाच मंत्री, एक विरोधी पक्षनेता
खा. इम्तियाज जलील म्हणाले, ५ मंत्री, विरोधी पक्षनेता जिल्ह्यात असल्याने पुढच्या वर्षी खड्ड्यांचा विषयच येणार नाही. रात्री १२ नव्हे तर दोन वाजेपर्यंत गणेशोत्सवाला परवानगी मिळावी. तसा निर्णय आपले मंत्री घेऊन येतील. खैरे माझ्याकडे बघून प्रेमाने हसत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधल्यावर सभागृहात हशा पिकला. ‘वक्रतुंड महाकाय’ हा श्लोक म्हणून त्यांनी शुभेच्छा दिल्या.