संजय शिरसाटांची मंत्रीपदासाठी मोर्चेबांधणी; शक्तिप्रदर्शनासाठी हजारो कार्यकर्ते मुंबईकडे रवाना
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2022 12:39 PM2022-07-14T12:39:44+5:302022-07-14T12:40:12+5:30
बंडखोरीच्या पहिल्या दिवसांपासून मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत असलेले आमदार संजय शिरसाट यांनी देखील मंत्रीपदासाठीच्या मोर्चेबांधणीत आता उडी घेतली आहे.
औरंगाबाद: शिवसेनेत झालेल्या बंडानंतर स्थापन झालेल्या शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारास अद्याप मुहूर्त लागलेला नाहीत. लवकरच शपथविधी होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटातील आमदारांनी मंत्रीपदासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यात बंडखोरीच्या पहिल्या दिवसांपासून मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत असलेले आमदार संजय शिरसाट यांनी देखील मंत्रीपदासाठीच्या मोर्चेबांधणीत आता उडी घेतली आहे. शक्तिप्रदर्शनासाठी त्यांच्या औरंगाबाद पश्चिम मतदार संघातील हजारो कार्यकर्ते आज सकाळी मुंबईकडे रवाना झाले आहेत.
शपथविधीच्या १५ दिवसानंतर देखील सध्या राज्याचा कारभार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस हे दोघेच सांभाळत आहेत. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे लागले आहे. शिंदे गट आणि भाजपात मंत्रीपदाची विभागणी अद्याप जाहीर झाली नाही मात्र त्यापूर्वीच आपल्याला मंत्रीपद मिळावे यासाठी आमदारांकडून शक्तिप्रदर्शन केले जात आहे. काही दिवसांपूर्वी हिंगोली जिल्हाप्रमुख पदावरून दूर केलेले संतोष बांगर यांनी देखील असेच शक्तिप्रदर्शन करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. दरम्यान, आज औरंगाबाद जिल्ह्यातील शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांचे समर्थक मुंबईकडे रवाना झाले आहेत. शिवसेना नगरसेवक, तालुकाप्रमुख, उपशहरप्रमुख, सरपंच, शाखाप्रमुख, महिला आघाडी तसेच सर्व आजी-माजी पदाधिकारी हे मोठ्या संख्येने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी मुंबई येथे आज सकाळी १० वाजता रवाना झाले आहे.
यात विजया शिरसाट, नगरसेवक सिंध्दात शिरसाट, हर्षदा शिरसाट, तुषार शिरसाट, माजी जिल्हाप्रमुख मचिंद्र सोनवणे, नगरसेविका शिल्पाराणी वाडकर, उपशहरप्रमुख रमेश बाहुले, राजू राजपूत, तालुकाप्रमुख हनुमान भोंडवे, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, आदीकराव पाटील, विभागप्रमुख हरिभाऊ हिवाळे, सुरेश बाहुले, शाखाप्रमुख रामेश्वर पेंढारे, मनोज सोनवणे, ईश्वर पारखे, शिवाजी हिवाळे, सुनील काळे, राम पाटोळे, युवासेना ज्योतिराम पाटील, सूरज शिंदे, अमोल पाटे, पंचायत समिती सदस्य राजेश साळे, सरपंच सचिन गरड, संदीप आरके, गणेश जाधव, मंगेश जाधव, श्रीकांत साळे, अनिल बिरारे, विजय पैठणे, राजन गरबडे, निलेश नरवडे, विशाल खंडागळे, अमर सभादिंडे, गुडू बसणीवाल आदींचा समावेश आहे.