मंत्रीमंडळात विस्तारावरून नाराज संजय शिरसाट यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2020 05:36 PM2020-01-01T17:36:11+5:302020-01-01T17:45:48+5:30

आमदार प्रदीप जैस्वाल यांनाही डावलल्यामुळे समर्थकांमध्ये नाराजी

Sanjay Shirsat upset over expansion of cabinet in Maharashtra | मंत्रीमंडळात विस्तारावरून नाराज संजय शिरसाट यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मंत्रीमंडळात विस्तारावरून नाराज संजय शिरसाट यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

googlenewsNext
ठळक मुद्देआयारामांची शिवसेना निष्ठावान शिवसैनिकांमध्ये नाराजीचा सूर 

औरंगाबाद : मंत्रिमंडळात समावेश न झालेले शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी मंगळवारी शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आपली नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांनी त्यांची नाराजी लक्षात घेत समजूत काढली असली तरी हाताशी आलेली संधी हुकल्यामुळे शिरसाट अस्वस्थ आहेत. आता आ. शिरसाट यांची अस्वस्थता पक्ष कशी दूर करणार, हे येणाऱ्या काळात कळेल. 

हॅट्ट्रीक करूनही संजय शिरसाट यांचा पत्ता का कट झाला?

आ. शिरसाट यांना एखादे महत्त्वाचे महामंडळ मिळते की भविष्यात पुन्हा होणाऱ्या विस्तारापर्यंत वाट पाहावी लागते, हे कळण्यास मार्ग नाही. राज्य  मंत्रिमंडळाच्या सोमवारी झालेल्या विस्तारात जिल्ह्यात दोन मंत्रिपदे मिळाली आहेत, मात्र शहरात एकही मंत्रिपद न मिळाल्यामुळे कार्यकर्ते नाराज आहेत.  मंत्रिमंडळात वर्णी लागणार या खात्रीमुळे आ. शिरसाट यांनी समर्थक व नातेवाईकांना मुंबईला नेण्याची तयारी करून ठेवली होती; परंतु आ. अब्दुल सत्तार यांच्यामुळे त्यांचा पत्ता कट झाल्याचे समर्थकांकडून ऐकण्यास मिळाले. आ. सत्तार यांना मंत्रिपद देण्याबाबत पक्षातील सर्वांचा एकमताने विरोध होता; परंतु मुख्यमंत्र्यांनी आ. सत्तार यांनी मंत्रिमंडळात वर्णी लावण्याचा शब्द दिला होता, त्यावर सत्तार अडून बसल्याने शेवटी नाईलाजास्तव आ. शिरसाट यांचे नाव डावलण्यात आले. 

दरम्यान, मंगळवारच्या भेटीत मुख्यमंत्री ठाकरे यांनी आ. शिरसाट यांच्या भावना समजून घेतल्या, शिवाय चिंता करू नका, काय द्यायचे ते मी निश्चित देईल. सध्या विस्तारात काही अडचणी होत्या, त्या समजून घ्या, असे मुख्यमंत्र्यांनी आ. शिरसाट यांना सांगितल्याची माहिती समोर आली आहे. येणाऱ्या काळात निश्चितपणे काहीतरी चांगलेच करील, असा शब्द मुख्यमंत्र्यांनी शिरसाट यांना दिला असल्याची माहिती आहे. 

निष्ठावान शिवसैनिकांमध्ये नाराजीचा सूर 
आ. संदीपान भुमरे यांना मंत्रीपद मिळाले, याचा शिवसैनिकांना आनंद  झाला आहे; परंतु सत्तार यांनी संधी मिळाल्यामुळे जुन्या निष्ठावान शिवसैनिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. आ. शिरसाट, आ. जैस्वाल किंवा आ. अंबादास दानवे यांच्यापैकी एकाला जरी संधी मिळाली असती तर चालले असते, अशी चर्चा सुरू आहे. आ. जैस्वाल यांनीदेखील शिवसेना नेते खा. चंद्रकांत खैरे यांच्याकडे नाराजी व्यक्त केल्याचे वृत्त आहे. २००९ ते २०१२ पर्यंतचा काळ सोडला, तर आ. जैस्वाल यांनी शिवसेनेची साथ सोडलेली नाही. त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल, अशी त्यांच्या समर्थकांना आशा होती. आयारामांना जर पदे मिळणार असतील तर निष्ठावानांनी काय करायचे, असा प्रश्न समर्थक उपस्थित करीत आहेत. 

Web Title: Sanjay Shirsat upset over expansion of cabinet in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.