संजय शिरसाटांचे मंत्रिपदाचे स्वप्न धूसर; भुमरे, सत्तारांचे तरी मंत्रिपदे टिकणार का?
By स. सो. खंडाळकर | Published: July 3, 2023 02:25 PM2023-07-03T14:25:11+5:302023-07-03T14:25:55+5:30
अजितदादांच्या सत्तेतील एन्ट्रीने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील राजकारण बदलणार कूस
छत्रपती संभाजीनगर : अजित पवार व समर्थक शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अचानक सहभागी झाल्याने जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. शिंदे गटाचे प्रवक्ते व पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांच्या मंत्रिपदाचे स्वप्न आता काहीसे धूसर झाले असून, विद्यमान मंत्रीद्वय संदीपान भुमरे व अब्दुल सत्तार यांना आपली मंत्रिपदे टिकविण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
विधानसभेतील विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादांनी आपल्या समर्थक आमदारांसह रविवारी बंड पुकारले. अजितदादा त्यांच्या ८ समर्थकांसह थेट शिंदे, फडणवीस सरकारात सामील झाल्याने मोठा राजकीय भूकंप झाला. जिल्ह्यात तशी राष्ट्रवादीची ताकद तोळामासाच आहे. त्यामुळे त्यांच्या बंडाचा थेट प्रभाव येथील राष्ट्रवादीच्या राजकारणावर दिसणार नाही.
औरंगाबाद जिल्ह्यात शिंदे गटाचे संदीपान भुमरे व अब्दुल सत्तार हे मंत्री आहेत. मंत्रिपदासाठी पहिल्यापासूनच पश्चिमचे आ. संजय शिरसाट हे गुडघ्याला बाशिंग बांधून बसले होते. आताही त्यांनी मंत्रिपदावरच थेट दावा केला होता. त्यातच अजित पवार यांच्या माध्यमातून ही नवी राजकीय घडामोड घडली. ठरलेल्या विस्तारात कुणाचे काय होणार, हा विस्तार होणार की नाही, याची धाकधूक आहेच. अब्दुल सत्तार व संदीपान भुमरे यांचे प्रगतिपुस्तक भाजपाला खटकत असल्याने त्यांना वगळण्याची सतत चर्चा होत आहेच. प्रत्यक्षात तसे होईल काय, याबद्दल प्रचंड औत्सुक्य आहे.
अजित पवार असे काही करणार, याची अनेकांना कल्पना होती. गेल्या दोन महिन्यांपासून हे शिजत होते, असे एका पदाधिकाऱ्याने सांगितले. ईडीला घाबरलेले लोक ‘तिकडे’ गेले, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मराठवाड्यातून अजित पवार समर्थक धनंजय मुंडे व संजय बनसोडे यांनी रविवारी मंत्रिपदाची शपथ घेतली. मराठवाड्याचे शिक्षक आ. विक्रम काळे हे अजित पवारांबरोबर दिसले. पदवीधर आ. सतीश चव्हाण यांची भूमिका स्पष्ट झालेली नाही. त्यानंतर या दोघांपैकी कोण मंत्री होणार, हे बघणेही महत्त्वाचे ठरेल. लोकसभा व विधानसभा निवडणुका जवळ येत चालल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर राजकारणाला वेग येत आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील काही कार्यकर्ते आम्ही अजितदादांबरोबरच राहणार, असे सांगत आहेत. यात पैठणचे अप्पा निर्मळ पाटील व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अनुराग शिंदे यांचा समावेश आहे, तर यापुढे काँग्रेसला पर्याय राहणार नाही, काँग्रेस वाढेल, असा विश्वास शहर काँग्रेसचे अध्यक्ष शेख युसूफ यांनी व्यक्त केला.