बालेकिल्ल्यात संजय शिरसाट यांचा विजयाचा चौकार; जाणून घ्या राजू शिंदेंच्या पराजयाची कारणे

By बापू सोळुंके | Published: November 24, 2024 12:23 PM2024-11-24T12:23:53+5:302024-11-24T12:27:04+5:30

औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघातून शिंदेसेनेच्या संजय शिरसाट यांनी उद्धवसेनेच्या राजू शिंदे यांचा १६,३५१ मतांनी केला पराभव

Sanjay Shirsat's victory in Sena's stronghold from Aurangabad West Assembly Constituency; Know the reasons behind Raju Shinde's defeat | बालेकिल्ल्यात संजय शिरसाट यांचा विजयाचा चौकार; जाणून घ्या राजू शिंदेंच्या पराजयाची कारणे

बालेकिल्ल्यात संजय शिरसाट यांचा विजयाचा चौकार; जाणून घ्या राजू शिंदेंच्या पराजयाची कारणे

छत्रपती संभाजीनगर : शिवसेनाचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी त्यांचे उद्धवसेनेचे प्रतिस्पर्धी उमेदवार राजू शिंदे यांचा १६ हजार ३५१ मतांनी पराभव करीत विजयाचा चौकार मारला. निवडणुकीची मतमोजणी चौथ्या टप्प्यात असतानाच शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्राबाहेर फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करीत जल्लोष केला.

पश्चिम मतदारसंघाची मतमोजणी शहरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय येथे शनिवारी कडेकोट पोलिस बंदोबस्तात आणि शांततेत पार पडली. शिंदेसेनेचे प्रवक्ता आ.संजय शिरसाटविरुद्ध उद्धवसेनेचे राजू शिंदे अशी ही निवडणूक झाल्याचे मतमोजणीतून स्पष्ट झाले. आमदार शिरसाट मागील पंधरा वर्षांपासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असल्याने त्यांनी आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. उद्धवसेनेचे उमेदवार राजू शिंदे यांनी त्यांना जोरदार झुंज दिल्याचे निकालावरून स्पष्ट होते. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील मतमोजणी केंद्रात १४ टेबलवर २९ फेऱ्या झाल्या. मतमोजणीच्या पहिल्या फेरीत राजू शिंदे यांना ५,६२२, तर शिरसाट यांना ५१०५ मते मिळाली होती. पहिल्या फेरीत शिंदे यांनी ५१९ मतांची आघाडी घेतली होती. मात्र, यानंतर आ.शिरसाट मागे राहिले नाही. दुसऱ्या फेरीत त्यांना एकूण १०,८०२ मते तर शिंदे यांना ८,२३९ मते मिळाली. दुसऱ्या फेरीपासून ते शेवटच्या २९ व्या फेरीपर्यंत शिरसाट मते मिळविण्यात आघाडीवर होते. २९व्या फेरीची मतमोजणी संपली, तेव्हा शिरसाट यांना एकूण १ लाख २२ हजार ४९८ मते मिळाली होती. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार शिंदे यांना १ लाख ६ हजार १४७ मते मिळाली होती.

मतमोजणी केंद्राकडे जाणारा रस्ता बंद
मतमोजणीस्थळी कोणतीही गडबड होऊ नये, यासाठी पोलिसांनी कडक पोलिस बंदोबस्त ठेवला होता. निवडणूक विभागाचे पासेस असलेल्या प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, उमेदवारांच्या प्रतिनिधींना, तसेच निवडणूक कामाशी संबंधित व्यक्तींनाच मतमोजणी केंद्रात प्रवेश दिला जात होता. एसएससी बोर्डपासून ते शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पूर्वेकडील गेटपर्यंत रस्ता बॅरिकेड लावून सार्वजनिक वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.

पश्चिम मतदारसंघातील जय-पराजयाची कारणे
विजयी उमेदवार संजय शिरसाठ

- मागील पाच वर्षांत मतदारसंघामध्ये केलेली विकासकामे
- प्रखर आत्मविश्वास
- शेवटच्या मतदारांपर्यंत पोहोचण्याचे सूक्ष्म नियोजन
- लाडकी बहीण योजनेचा अभूतपूर्व परिणाम
- इच्छुक उमेदवारांचा विश्वास संपादन करण्यात यश
- पक्षाचे मजबूत संघटन कामी

पराभूत उमेदवार राजू शिंदे
- ऐनवेळी पक्ष बदलून निवडणूक रिंगणात
- नियोजनाचा भरपूर अभाव
- ऐनवेळी मराठा ‘कार्ड’ची गुगली
- विश्वासात न घेता सर्व समाजाला गृहीत धरणे नडले
- इच्छुक उमेदवारांची नाराजी
- पक्षांतर्गत गटबाजी नडली

औरंगाबाद ‘पश्चिम’मध्ये कोणाला किती मते मिळाली?
उमेदवाराचे नाव-------पक्ष---- मिळालेली मते

१) आ. संजय शिरसाट - शिवसेना--- १२२४९८
२) राजू शिंदे------ उद्धवसेना---------१०६१४७
३) कुणाल लांडगे---बहुजन समाज पार्टी--११८३
४) ॲड. अनिल धुपे-- हिंदुस्थान जनता पार्टी---६२५
५) अरविंद कांबळे- बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी--५७३
६) अंजन साळवे- वंचित बहुजन आघाडी----९६६७
७) कैलास सोनोने-- पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक--१६१
८) पंचशिला जाधव-- रिपब्लिकन बहुजन सेना--२३९
९) मुकुंद गाढे-- संपूर्ण भारत क्रांती पार्टी--१८८
१०) रमेश गायकवाड-- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक---२४४०
११) संजीवकुमार इखारे-- रिपब्लिकन पक्ष (खोरीपा)--१०३
१२) संदीप शिरसाट-- महाराष्ट्र स्वराज्य पार्टी---८५३
१३) अनिल जाधव--अपक्ष----२१४
१४) जगन साळवे- अपक्ष----३४२
१५) निखिल मगरे- अपक्ष----५६५
१६) मधुकर त्रिभुवन- अपक्ष---३४१
१७) मनीषा खरात- अपक्ष---------२१९
१८) सुलोचना आक्षे- -अपक्ष---५२६
१९) नोटा--- १७०३
२०) अपात्र मते-- २४८

एकूण मतदान-- २,४८,५८७

Web Title: Sanjay Shirsat's victory in Sena's stronghold from Aurangabad West Assembly Constituency; Know the reasons behind Raju Shinde's defeat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.