जिल्ह्यात संततधार
By Admin | Published: September 7, 2014 11:53 PM2014-09-07T23:53:22+5:302014-09-08T00:04:14+5:30
हिंगोली : मागील चार दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने रविवारी सकाळपासून संततधार लावली.
हिंगोली : मागील चार दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने रविवारी सकाळपासून संततधार लावली. अगदी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत हा पाऊस असल्यामुळे पिकांना आधार पोहोचला. बरोबर गत रविवारी दिवसभर असाच पाऊस झाला होता. पाणीपातळीत नोंद घेण्याऐवढी वाढ झाली नसल्यामुळे अद्यापही पाण्याचे स्त्रोत तहानलेले आहेत.
पूर्वा नक्षत्राचे एक चरण नुकतेच संपले. याच्या पूर्वाधार्त जोरदार पाऊस झाला. उत्तरार्धात कोरडे हवामान होते. दरम्यान शेतकऱ्यांनी फवारणी, निंदणी, खुरपणी, कोळपणी करून घेतली. आता पुन्हा पावसास सुरूवात झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. दिवसभर भीज पाऊस झाल्याने पूर्णत: जमिनीत पाणी मुरले. आज पावसाळ्याला तीन महिने उलटले तरी जमिनीच्या बाहेर पाणी निघाले नाही. परिणामी पाण्याचे स्त्रोत भरले नाहीत. एकवेळा सर्व नद्या, नाले, ओढे वाहिले. सध्या ते कोरडेठका असल्यामुळे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही. अद्यापही मोठ्या पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागली आहे. औंढा तालुक्यात पहिल्यापासूनच अधिक पाऊस होत असल्याने येथील सरासरी ५०० मिमीजवळ पोहोचली.
दुसरीकडे कळमनुरी आणि सेनगाव तालुक्यांनी ४०० मिमीटा टप्पा ओलांडला. अनुक्रमे ४०२ आणि ४१२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. नेहमी पावसात आघाडीवर राहणारा हिंगोली तालुका सर्वात खाली गेला. उलट वसमत तालुक्यात ३४१ मिमी पाऊस झाला; परंतु पाण्याचे स्त्रोत कोरडे असल्यामुळे भरपूर पाण्याची आवश्यकता आहे. पण पावसाचे दिवस संपत आल्याने शेतकऱ्यांकडून पावसाचा धावा संपलेला नाही.
कनेरगाव : हिंगोली तालुक्यातील कनेरगाव नाका परिसरातही रविवारी जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे नदी-नाल्यांना पाणी आले होते. (प्रतिनिधी)
औंढा नागनाथ : दोन दिवसांच्या उघाडीनंतर रविवारी सकाळपासूनच पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे दिवसभर जनजीवन विस्कळीत झाले होते. असाच पाऊस सुरू राहिल्यास याचा परिणाम गणेश विसर्जन मिरवणुकीवर होऊ शकतो.
दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर शनिवारी रात्रीपासून पावसाचे पुनरागमन झाले आहे.रविवारी तालुक्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे. औंढ्यात दिवसभर पाऊस राहिल्याने बाजारपेठ व गणेश मंडळाच्या महाप्रसादावरसुद्धा परिणाम जाणवला आहे.
सेनगाव : सेनगावसह तालुक्यात रविवारी सकाळपासूनच पावसाची दिवसभर संततधार चालू होती. दुपारनंतर तीन तास जोराचा पाऊस झाला. तालुक्यात रविवारी दिवसभर पाऊस चालू होता. समाधानकारक असा पाऊस तालुक्यातील सेनगाव, गोरेगाव, वरूड चक्रपान, पानकनेरगाव, आजेगाव, पुसेगाव, साखरा, हत्ता आदी भागात झाला. दुपानंतर जोरदार असा पाऊस सायंकाळी ५ वाजेपर्यंत चालुच होता. त्यामुळे नदी, नाल्याला पाणी आले होते. समाधानकारक पावसामुळे शेतकरी सुखावला आहे.
वसमत : शहर व तालुक्यात रविवारी सकाळपासून संततधार पाऊस सुरू आहे. सकाळी सुरू झालेला पाऊस सायंकाळीही सुरू होता. या पावसाने गणेश विसर्जनाच्या तयारीत असलेल्या मंडळाच्या तयारीच्या उत्साहावर पाणी फेरल्या गेल्याचे चित्र आहे.
गणेशाच्या आगमनाने पावसाचेही आगमन झाले. शेतकरी व सर्व सामान्यांना आनंद झाला होता. गेला आठवडाभर चांगला पाऊस झाला. आता सोमवारी गणेशाचे विसर्जन होणार आहे. त्यासाठी मंडळे तयारीला लागले होते; परंतु रविवारी दिवसभर पावसाची झड लागल्याने गणेश मंडळांची तयारी पाण्यात गेली. अनेक मंडळांनी रविवारी महाप्रसादाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचाही पावसाने उत्साह कमी झाला. दिवसभरच्या पावसाने उघडी, आसना नदीला भरपूर पाणी आले होते. शहरात एरवी गजबलेले रस्ते आज निर्मनुष्य होते. रस्त्यावरील खड्ड्यात मात्र पावसाचे पाणी साचून शहरभर तलावच तलाव पहावयास मिळत आहे.