संत एकनाथ महाराजांच्या नावाने संतपीठ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2020 05:12 AM2020-09-20T05:12:14+5:302020-09-20T05:13:04+5:30
उदय सामंत यांची घोषणा । १ जानेवारीपासून सुरू होणार, २२ कोटींचा खर्च सरकार उचलणार
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : पैठण येथे संतपीठ उभारणारीचा मागील ४० वर्षांपासून रखडलेला प्रकल्प मार्गी लावण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी २२ कोटी रुपये खर्च लागणार असून, त्यास जगद्गुरू संत एकनाथ महाराज यांचे नाव देण्यात येणार आहे. १ जानेवारीपासून प्रत्यक्ष अभ्यासक्रमाला सुरुवात होईल. त्यासाठी
येत्या महिनाभरात इमारतींची दुरुस्ती केली जाणार असल्याची घोषणा उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आगामी परीक्षा आणि संतपीठाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी सामंत शनिवारी आले होते. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ते म्हणाले, मागील ४० वर्षांपासून रखडलेल्या संतपीठाचा प्रश्न मार्गी लावण्यात आला आहे.
१ जानेवारीपासून तबला, पखवाज, गायनसह इतर अभ्यासक्रम सुरू होतील. या संतपीठाला संत एकनाथ महाराजांचे नाव
देण्यात येईल. संतपीठ सुरू करण्याचे नेहमीच आश्वासन दिले जाते, याकडे लक्ष वेधले असता, त्यांनी १ जानेवारीपासून संतपीठ सुरू न झाल्यास मला जबाबदार धरा, असे सांगितले.
प्राचार्य, प्राध्यापक भरतीला लवकर मान्यता
महाविद्यालय, विद्यापीठातील सहायक प्राध्यापक, प्राचार्यांच्या रिक्त जागा भरण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी या विषयावर चर्चा झाली असून, ते सकारात्मक आहेत. ४ मे रोजी काढलेल्या शासन निर्णयातून या भरतीला वगळण्यात येईल. तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क कमी करण्यासाठी एक समिती नेमली आहे. ही समिती लवकरच अहवाल सादर करेल, त्यानंतर शुल्क कपातीचा निर्णय घेतला जाईल, असेही सामंत यांनी स्पष्ट केले.
संतपीठाच्या उभारणीचा प्रवास
- १९७५ साली तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी संतपीठ स्थापन करण्याची घोषणा केली.
- ४२ कलमी कार्यक्रमांतर्गत संतपीठ उभारण्याचा निर्णय २३ जानेवारी १९८१ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री बॅ. ए.आर. अंतुले यांनी जाहीर केला.
- २३ मार्च १९८१ रोजी बाळासाहेब भारदे यांच्या अध्यक्षतेखाली १२ सदस्यांची समिती स्थापन.
- १९९१-९२ च्या अर्थसंकल्पात संतपीठासाठी १ कोटी रुपयांचा निधी.
- ४ नोव्हेंबर १९९८ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी, उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या उपस्थितीत प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन.
- २०११ मध्ये राज्य सरकारच्या सांस्कृतिक विभागाने संतपीठाचे हस्तांतरण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडे केले.
- २ फेब्रुवारी २०११ रोजी संतपीठातील अभ्यासक्रम जून महिन्यापासून सुरू करण्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आदेश.
- १३ फेब्रुवारी २०१४ रोजी तत्कालीन सांस्कृतिकमंत्री संजय देवतळे यांच्या हस्ते प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन.
- २०१८ च्या नागपूर येथील विधिमंडळाच्या अधिवेशनात तत्कालीन सांस्कृतिक तथा उच्चशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी बैठक घेत संतपीठ सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी औरंगाबादचे माजी उपमहापौर संजय जोशी, तत्कालीन प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर आणि मंत्रालयातील सहसचिव डॉ. सिद्धार्थ खरात यांची समिती स्थापन.
- समितीने अहवाल तयार करून संतपीठाला केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा देण्यासाठी राज्य शासनामार्फत केंद्र शासनाकडे प्रस्ताव सादर केला.
- १२ मार्च २०२० रोजी उदय सामंत यांनी येत्या १५ दिवसांत संतपीठ सुरू करण्याची घोषणा केली.