जानेवारी महिन्यापासून सुरू होणार पैठण येथील संतपीठ, १५ दिवसांत मिळणार मान्यतेचा आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2020 07:10 PM2020-09-19T19:10:55+5:302020-09-19T19:18:15+5:30
संतपीठाच्या ३८ वर्षांच्या कार्यकाळात राज्य शासनाने यापूर्वी २०११ व २०१४मध्ये पैठण येथील संतपीठातून अभ्यासक्रम सुरू करण्याची घोषणा केली होती. परंतु या घोषणेची अंमलबजावणी झाली नाही. आता उच्च व तंत्रशिक्षण मंत्री सामंत यांनी येत्या जानेवारी २०२१पासून संतपीठातून काही अभ्यासक्रम सुरू करण्याची घोषणा केली आहे.
औरंगाबाद - संत एकनाथ महाराज यांच्या नावाने पैठण येथील संतपीठ जानेवारी २०२१ पासून सुरू करण्यात येणार आहे. तसेच या संदर्भातील अध्यादेश १५ दिवसांत निघेल, असे आश्वासन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले आहे. संतपीठाच्या प्रशासकीय इमारतीची पाहणी केल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज पैठण येथील संतपीठाची पाहणी केली. यावेळी राज्याचे रोहयो तथा फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, आमदार आंबादास दानवे उपस्थिती होती.
संतपीठाच्या ३८ वर्षांच्या कार्यकाळात राज्य शासनाने यापूर्वी २०११ व २०१४मध्ये पैठण येथील संतपीठातून अभ्यासक्रम सुरू करण्याची घोषणा केली होती. परंतु या घोषणेची अंमलबजावणी झाली नाही. आता उच्च व तंत्रशिक्षण मंत्री सामंत यांनी येत्या जानेवारी २०२१पासून संतपीठातून काही अभ्यासक्रम सुरू करण्याची घोषणा केली आहे.
संतपीठास संत एकनाथांचे नाव -
या संतपीठाला वारकरी सांप्रदायाचे खांब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पैठण येथील संत एकनाथांचे नाव देण्यात आल्याचे सामंत यांनी यावेळी सांगितले. हे संतपीठ औरंगाबाद येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गत चालविण्यात येणार आहे. तसेच यासाठी लागणारा प्रशासकीय खर्च राज्य सरकार विद्यापीठास देणार आहे. हे संतपीठ कार्यान्वित करण्यासाठी २२ कोटी रूपयाची गरज आहे. संतपीठासाठी निधी दिला जाईल, असेही सामंत यांनी यावेळी सांगितले.
संतपीठ मान्यतेचा आदेश १५ दिवसात -
संतपीठ मान्यतेचा राज्य शासनाचा आदेश येत्या १५ दिवसात राज्याचे फलोत्पादन तथा रोहयो मंत्री संदिपान भुमरे व आमदार आंबादास दानवे यांच्याकडे सुपूर्द करण्यात येईल, असेही सामंत यांनी यावेळी सांगितले.
असा आहे संतपीठाचा ३८ वर्षाचा प्रवास -
संतपीठाची नेमकी संकल्पना राज्यकर्त्यांना समजलीच नाही. प्रत्येक बैठकीत नवा निर्णय घ्यायचा व विसरून जायचे, असेच संतपीठ सुरू करण्याच्या बाबतीत सातत्याने, म्हणजेच तब्बल ३८ वर्षं दिसून आले.
मराठवाड्याच्या विकासासाठी ४२ कलमी कार्यक्रमांतर्गत हे संतपीठ उभारण्याचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री ए.आर. अंतुले यांनी २३ जानेवारी १९८१ रोजी घेतला होता. बाळासाहेब भारदे यांच्या अध्यक्षतेखाली १२ जणांची समिती २३ मार्च १९८१ रोजी स्थापन करण्यात आली. (समितीतील ८ सदस्यांचा मृत्यू झाला आहे.) पाटबंधारे विभागाने संत ज्ञानेश्वर उद्यानातील १७ एकर जमीन संतपीठ उभारण्यासाठी दिली. १९९१-९२ च्या अर्थसंकल्पात संतपीठासाठी १ कोटीचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता.
मनोहर जोशी आणि गोपीनाथ मुंडे यांच्या उपस्थितीत ४ नोव्हेंबर १९९८ रोजी संतपीठाच्या कामाचे भूमिपूजन झाले होते. संतपीठाच्या इमारतीचे बांधकाम तब्बल १५ वर्षे रखडले, ६ हजार ९५८ चौ.फू. आकाराच्या या जमिनीवरील संतपीठाची इमारत तयार झाली. भव्य सभागृह, बैठक सभागृह, विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, अद्ययावत ग्रंथालय, उपाहारगृह, टपाल कार्यालय, बँक, जलकुंभ आणि विद्युतव्यवस्था या इमारतीत करण्यात आली. यानंतर संतपीठाचा कारभार सांस्कृतिक विभागाकडे देण्यात आला.
राज्य सरकारच्या सांस्कृतिक विभागाने संतपीठाचा कारभाराचे हस्तांतरण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडे केले. २ फेब्रुवारी २०११ रोजी संतपीठातील अभ्यासक्रम जून महिन्यापासून सुरू करण्याचे आदेश तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते.
संतपीठाच्या इमारतीचे उद्घाटन राज्याचे तत्कालीन सांस्कृतिकमंत्री संजय देवतळे यांच्या हस्ते १३ फेब्रुवारी २०१४ रोजी करण्यात आले. गत वर्षी तत्कालीन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी संतपीठाला केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा मिळावा म्हणून प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर केला होता. दरम्यान आता पुन्हा संतपीठ डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामार्फत कार्यान्वित होईल, असे विद्यमान शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी घोषित केले आहे.
संतपीठाचा अभ्यासक्रम अद्याप ठरलेला नाही -
संतपीठाचा अभ्यासक्रम व संतपीठाची रचना कशी असेल, याबाबत निश्चित धोरण आद्यापही ठरलेले नाही. केवळ या दोन बाबींमुळे संतपीठ आजतागायत कार्यान्वित होऊ शकले नाही, हे समोर आले आहे. अभ्यासक्रम ठरविण्यासाठी सांस्कृतिक विभागाने अनेक बैठका घेतल्या. वेळोवेळी समित्या स्थापन केल्या. अभ्यासक्रमाबाबत समिती सदस्यांत दुमत निर्माण झाले. मात्र, अभ्यासक्रम काही ठरला नाही. याबाबतीत बैठक घेणे एवढी औपचारिकता मात्र राज्य शासनाने पार पाडली. आता संत साहित्याचे काही अभ्यासक्रम सुरू केले जातील, असे सामंत यांनी म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या -
भारत-चीन वादात रशियाची एन्ट्री, मोठा आहे पुतीन यांचा आशिया खंडातला प्लॅन
धक्कादायक खुलासा : भारतात तब्बल 62 टक्के महिला अॅप्सच्या माध्यमाने करतात 'सेक्सटिंग'
रशियन कोरोना लस दिल्यानंतर दिसताहेत 'हे' साइड इफेक्ट्स, भारतातही येणार आहेत कोट्यवधी डोस
"झोपेत घोरत असाल तर सावधान! कोरोनामुळे मृत्यूचा तिप्पट धोका"
मोदी सरकार आणतंय नवी पॉलिसी, भंगारमध्ये जाणार तुमची जुनी गाडी