संतपीठ सप्टेंबरपासून सुरू होईल : उदय सामंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:02 AM2021-07-01T04:02:22+5:302021-07-01T04:02:22+5:30
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात ते पत्रकारांशी वार्तालाप करीत होते. त्यांनी सांगितले की, आम्ही एक पाऊल पुढे टाकले आहे. इमारतीसाठी पालकमंत्री ...
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात ते पत्रकारांशी वार्तालाप करीत होते.
त्यांनी सांगितले की, आम्ही एक पाऊल पुढे टाकले आहे. इमारतीसाठी पालकमंत्री सुभाष देसाई यांनी एक कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत. इमारतीचे काम लवकर पूर्ण होईल. सप्टेंबरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संतपीठाचे उद्घाटन होईल.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्र विद्यापीठाचे उपकेंद्र औरंगाबादसारख्या ठिकाणी असावे, अशी भूमिका होती. हे केंद्र शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. पुढच्या आठ दिवसांत यात प्रगती करण्याचे आदेश दिल्याची माहिती सामंत यांनी यावेळी दिली.
औरंगाबाद येथील विभागीय ग्रंथालयाला निधी उपलब्ध करून देण्याची मागणी होती. त्यानुसार लवकरच हा निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
संतपीठ सुरू करण्याबाबत आजपर्यंत केवळ आश्वासने मिळाली. उदय सामंत काय घोषणा करतात, याकडे शिक्षण क्षेत्राचे लक्ष होते.
.....................
चांगल्या कामाला खीळ घालण्याचा प्रयत्न...
उदय सामंत यांनी यावेळी विविध राजकीय प्रश्नांना उत्तरे दिली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून उपमुख्यमंत्री अजित पवार व परिवहनमंत्री अनिल परब यांची सीबीआय चौकशीची मागणी केली आहे, याकडे लक्ष वेधले असता सामंत उत्तरले, चांगल्या कामाला खीळ घालण्याचा ते प्रयत्न करीत आहेत. विरोधक म्हणून ते त्यांचे काम बजावत आहेत.
विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवड करण्याबद्दल व अधिवेशनाचा कालावधी वाढविण्याबाबत राज्यपालांनी सूचित केले आहे. भाजपचे शिष्टमंडळ भेटल्यानंतर त्यांनी हे पत्र लिहिलं आहे. त्यात त्यांनी स्वतःचं मत नोंदवलेले नाही. मी एक साधा शिवसैनिक आहे. विधानसभा अध्यक्षपदाचा निर्णय श्रेष्ठी घेतील. मी काही सांगणे योग्य नाही, असे सामंत म्हणाले.
.................
नाणारला रिफायनरी होणे नाही, असेही एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी स्पष्ट केले.
आमदार अंबादास दानवे व वरिष्ठ अधिकारी यांची या पत्रपरिषदेस उपस्थिती होती.