संतपीठाची इमारत निवडणुकीसाठी अधिग्रहित; विद्यार्थ्यांना शिकवणार कुठे?
By विजय सरवदे | Published: November 1, 2023 03:55 PM2023-11-01T15:55:15+5:302023-11-01T16:06:06+5:30
विद्यापीठ प्रशासन संभ्रमात : पैठण तहसीलदारांनी इमारत अधिग्रहित केल्याची बजावली नोटीस
छत्रपती संभाजीनगर : ४० वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर दोन वर्षांपूर्वी सुरू झालेल्या पैठण येथील संतपीठाच्या मागचे शुक्लकाष्ठ काही संपता संपत नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी संतपीठाच्या इमारतीसह परिसर अधिग्रहित करण्याचे आदेश दिले. त्यामुळे संतपीठात पाच अभ्यासक्रमांचे शिक्षण घेत असलेल्या १२५ विद्यार्थ्यांना कोठे शिकवायचे, असा प्रश्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्रशासनासमोर आहे.
१९९० च्या दशकापासून संतपीठाचे भिजत घोंगडे पडलेले होते. संतपीठासाठी पैठणजवळ एक इमारतही बांधण्यात आली. मात्र, संतपीठाचे उत्तरदायित्व कोण स्वीकारणार, यावरून अनेक वर्षांपासून संतपीठ सुरू होऊ शकले नव्हते. १७ सप्टेंबर २०२१ रोजी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने संतपीठाचा श्रीगणेशा केला. संतपीठाचे संचलन करण्याची जबाबदारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठावर सोपवली. त्यानुसार विद्यापीठाने संतपीठात पाच अभ्यासक्रम सुरू केले. त्या अभ्यासक्रमांना १२५ विद्यार्थी शिक्षण घेतात. विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी हॉलसह क्लासरूम बनविल्या. त्यात विद्यार्थी वारकरी संप्रदायाचे धडे गिरवत आहेत. असे असतानाच जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी २०१९ मधील लोकसभा व विधानसभेची निवडणूक प्रक्रिया पार पडलेल्या संतपीठात निवडणूक विभागाची स्ट्राँग रूम, निवडणूक साहित्य वाटप व स्वीकृती, प्रशिक्षण घेणे, मतमोजणी, जेवणाची सुविधा व पार्किंगसाठी संतपीठाची इमारत आणि जागा परिसर अधिग्रहित करण्याचे आदेश दिले. पैठणच्या तहसीलदारांनी त्याविषयीचे पत्र कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांना पाठविले आहे.
वर्ग कुठे भरवणार?
संतपीठाची इमारत २०१९ साली निवडणूक कामासाठी वापरली होती. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी २०२४ च्या निवडणुकीसाठी इमारत अधिग्रहित करण्याचे आदेश दिले. मात्र, २०१९ ला संतपीठ सुरू झाले नव्हते. २०२१ साली ते सुरू झाले आहे. पाच अभ्यासक्रम शिकविले जातात. ते शैक्षणिक साहित्य मोठ्या प्रमाणात आहे. ते कोठे नेऊन वर्ग भरवावेत, असा प्रश्न संतपीठ प्रशासनाला पडल्याचे सूत्रांनी सांगितले.
कुलगुरूंच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही
संतपीठाची इमारत व परिसर अधिग्रहित करण्याचे आदेश आले आहेत. विद्यापीठ प्रशासनाच्या अडचणी निवडणूक विभागाला कळविण्यात येतील.कुलगुरूंच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल.
-डॉ. भगवान साखळे, कुलसचिव