श्रमिक तास कमी केल्याच्या विरोधात एसटी कामगारांची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 06:36 PM2017-07-30T18:36:30+5:302017-07-30T18:37:06+5:30
एसटी महामंडळाने श्रमिक तास कमी केल्याच्या निषेधार्थ चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळेतील कामगारांनी दुपारी १२.३० वाजता कार्यशाळेसमोर निदर्शने केली.
ऑनलाईन लोकमत
औरंगाबाद, दि. ३० : एसटी महामंडळाने श्रमिक तास कमी केल्याच्या निषेधार्थ चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळेतील कामगारांनी दुपारी १२.३० वाजता कार्यशाळेसमोर निदर्शने केली. यावेळी कामगारांनी महामंडळाच्या परिपत्रकाची होळी करत जोरदार घोषणाबाजी केली.
एसटी महामंडळाच्या राज्यभरात दापोडी, औरंगाबाद आणि नागपूर येथे मध्यवर्ती कार्यशाळा आहेत. या तिन्ही ठिकाणी बस बांधणी केली जाते. या कार्यशाळांमधील कामाचा (टाइम व मोशन) अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञ सल्लागारांची नियुक्ती करण्यात आली होती. या सल्लागार समितीच्या अहवालानुसार श्रमिक तास निश्चित करण्यात आले. यामध्ये २०० श्रमिक तास कमी करण्याची शिफारस करण्यात आली आहे. या श्रमिक तासांची अंमलबजावणी करण्याचे आदेश मध्यवर्ती कार्यशाळेच्या व्यवस्थापकांना देण्यात आले आहेत.
या निर्णयाला कामगारांनी विरोध दर्शविला आहे. श्रमिक तास कमी झाल्याने कमी वेळात अधिक काम करावे लागणार आहे. यामुळे या निर्णयाविरोधात विविध संघटनांची संयुक्त कृती समिती स्थापन करून कामगारांनी आंदोलनाचा निर्णय घेतला. या आंदोलनात महामंडळाच्या परिपत्रकाची होळी करीत कामगारांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. यावेळी परिवहन मंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या.