गंगापूर तालुक्यात सर्रास वृक्षतोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 12:28 AM2018-01-31T00:28:34+5:302018-01-31T00:28:38+5:30
गंगापूर तालुक्यात बेकायदेशीर वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होत असून याकडे वन विभागाकडून जाणूनबुजून कानडोळा केला जात आहे. गंगापूर, लासूर स्टेशन, वाळूज परिसरातील आरा मशीन (वखार) मध्ये लाकडांचे ढीग दिसून येत आहेत. वनसंपदा नष्ट होत असल्याने निसर्गप्रेमींनी नाराजी व्यक्त केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गंगापूर : गंगापूर तालुक्यात बेकायदेशीर वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होत असून याकडे वन विभागाकडून जाणूनबुजून कानडोळा केला जात आहे. गंगापूर, लासूर स्टेशन, वाळूज परिसरातील आरा मशीन (वखार) मध्ये लाकडांचे ढीग दिसून येत आहेत. वनसंपदा नष्ट होत असल्याने निसर्गप्रेमींनी नाराजी व्यक्त
केली.
गंगापूर तालुक्यात शिवना, नारळी, गोदावरी, खाम नदी काठावरील घोडेगाव, पळसगाव, शेंदुरवादा, कनकोरी, कोळघर, लासूर स्टेशन, नेवरगाव, हैबतपूर, बगडी, कानडगाव, धनगरपट्टी या गावातून मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जात आहे. तालुक्यात होत असलेली वृक्षतोड वनविभागाच्या नजरेआड नाही.
अधिकारी व कर्मचारी या परिसरातील वृक्षतोड करणाºयांशी संपर्क साधून आहेत. त्यामुळे जंगलतोड करणारे शेतातील, माळरानावरील, शेताच्या बांधावरील व नदी काठावरील अतिजुनाट वृक्षे बेकायदेशीर तोडून आपले चांगभले करुण घेत आहेत.
गंगापूर तालुक्यात ४० ते ५० वर्षांपूर्वीच्या झाडांची तोड केली जात असल्याचे दिसत आहे. लिंब, चिंच, उंबर, वड, पिंपळ, बेल ही झाडे तोडण्यास शासनाकडून बंदी केली आहे. तरी देखील या झाडांची सर्रास कत्तल होत आहे. ही झाडे तोडण्यासाठी परवानगी घ्यावी लागते. मात्र वनविभाग व वृक्षतोड करणाºयांमध्ये आर्थिक हितसंबंध जोपासले जात असल्याने कुणावरही कारवाई होताना दिसत नाही.
पशुपक्षी हे सैरभैर
पर्यावरणाचा समतोल राहण्यासाठी या वृक्षांचे मोठे महत्व आहे. वृक्षतोडीमुळे पशुपक्षांना देखील वास्तव्य करण्याची गैरसोय होऊ लागली आहे. त्यामुळे पशुपक्षी हे सैरभैर झाले आहेत. वृक्षतोडीची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करुन वृक्षतोडीला आळा घालवा, अशी मागणी पर्यावरणप्रेमींकडून होत आहे.