सरस्वती भुवन महाविद्यालयात जात वैधता प्रमाणपत्र नसताना प्राध्यापकपदी निवड
By राम शिनगारे | Published: October 7, 2023 01:44 PM2023-10-07T13:44:50+5:302023-10-07T13:45:26+5:30
निवड रद्द करण्याची आदिवासी संशोधक, हक्क समितीची मागणी
छत्रपती संभाजीनगर : सरस्वती भुवन महाविद्यालयात अनुसूचित जमातीच्या जागेवर जात प्रमाणपत्राची वैधता नसलेल्या उमेदवारांची निवड केली आहे. ही निवड रद्द करीत वैधता प्रमाणपत्र धारण करणाऱ्या उमेदवारांची निवड करावी, अशी मागणी आदिवासी संशोधक विद्यार्थी कृती समिती, ऑर्गनायझेशन फॉर राईटस् ऑफ ट्रायबल्स आणि विद्यापीठ अधिसभा सदस्यांनी संस्थेसह कुलगुरूंकडे निवेदनाद्वारे केली आहे.
प्राणिशास्त्र विषयासाठी अनुसूचित जमातीच्या उमेदवाराची निवड करण्यात आली आहे. संबंधित उमेदवाराकडे जात वैधता प्रमाणपत्र नसल्याचा दावा आदिवासी संशोधक विद्यार्थी कृती समिती, ऑर्गनायझेशन फॉर राईटस् ऑफ ट्रायबल्स संघटनेने केला आहे. मराठवाडा विभागात कोळी जातीचे लोक कोळी महादेव किंवा मल्हार कोळी अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र खोटे पुरावे तयार करून मिळवत असल्याचे शासनाने स्थापन केलेल्या विभागीय चौकशीत निदर्शनास आले आहे. तसेच औरंगाबाद खंडपीठानेही याविषयी अलीकडेच निरीक्षण नोंदवले आहे. तसेच काही याचिकांमध्ये अशा पद्धतीच्या प्रमाणपत्रांमुळे जात वैधता प्रमाणपत्र असल्याशिवाय संबंधित उमेदवाराची अनुसूचित जमातीच्या जागेवर निवड करण्यात येऊ नये, असे आदेशच शासनाने दिलेले आहेत. त्या आदेशाचे स. भु. ने उल्लंघन केले असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. दोन्ही संघटनांच्या निवेदनावर अनिस तडवी, शिल्पा धनवे, साधू पावरा, आकाश ढोले, गजानन डुकरे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
अधिसभा सदस्याचे कुलगुरूंना निवेदन
विद्यापीठाचे अधिसभा सदस्य डॉ. चंद्रकांत कोकाटे यांनी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांना निवेदन देत विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयांमध्ये अनुसूचित जमातीच्या जागांवर निवड करताना संबंधितांचे जात वैधता प्रमाणपत्र अनिवार्य करावे, अशी मागणी केली आहे. स. भु. संस्थेत एसटीच्या जागेवर निवडलेल्या उमेदवाराकडे जात वैधता प्रमाणपत्र नसल्याचे उघडकीस आल्याचेही त्यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे. त्या निवडीला मान्यताही देण्यात येऊ नये, अशी मागणी केली आहे.