अनियमिततेच्या वादातून सरस्वती भुवन संस्थेच्या सचिवांचा राजीनामा ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 02:27 PM2021-08-27T14:27:07+5:302021-08-27T14:32:38+5:30

स.भु. शिक्षणसंस्थेच्या नियामक मंडळाची बैठक शनिवारी (दि.२१) बोलावण्यात आली होती. या बैठकीमध्ये संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी जालना येथील सरस्वती भुवन प्रशालेच्या जुन्या इमारतीच्या एका भागाचा मजला पाडण्याचा विषय ठेवण्यात आला होता.

Saraswati Bhuvan secretary resigns over irregularities | अनियमिततेच्या वादातून सरस्वती भुवन संस्थेच्या सचिवांचा राजीनामा ?

अनियमिततेच्या वादातून सरस्वती भुवन संस्थेच्या सचिवांचा राजीनामा ?

googlenewsNext
ठळक मुद्देजालना येथील शाळेच्या बांधकामावरून घडलेली घटना सचिव डॉ. नंदकुमार उकडगावकर नियामक मंडळाच्या बैठकीतून निघून गेले

- राम शिनगारे
औरंगाबाद : मराठवाड्यातील शिक्षणक्षेत्रातील नामांकित असलेल्या सरस्वती भुवन शिक्षणसंस्थेच्या नियामक मंडळाच्या बैठकीत जालना येथील सरस्वती भुवन प्रशालेच्या इमारतीचा मजला पाडण्यावरून सदस्यांमध्ये खडाजंगी झाली. यातून संस्थेचे सचिव डॉ. नंदकुमार उकडगावकर यांनी बैठकीतच राजीनामा देत ते निघून गेल्याचा प्रकार घडला आहे. यानंतर ते संस्थेच्या कार्यालयात गुरुवारपर्यंत आलेले नाहीत, अशी माहिती संस्थेतील सूत्रांनी दिली. ( Saraswati Bhuvan secretary resigns over irregularities) 

स.भु. शिक्षणसंस्थेच्या नियामक मंडळाची बैठक शनिवारी (दि.२१) बोलावण्यात आली होती. या बैठकीमध्ये संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी जालना येथील सरस्वती भुवन प्रशालेच्या जुन्या इमारतीच्या एका भागाचा मजला पाडण्याचा विषय ठेवण्यात आला होता. या बैठकीत, प्रशालेच्या वरचा एक मजला परवानगी न घेताच पाडण्यात आला. आता खालच्या मजला पाडण्याची परवानगी मागत आहेत. परंतु मान्यता नसताना पाडलेल्या वरच्या मजल्याचे काय, यावर आधी बोला, अशी नियामक मंडळाचे सदस्य डॉ. श्रीरंग देशपांडे यांनी केली. संस्थेच्या एका माजी सचिवांनी परवानगी न घेता भूखंड विकला, चालू बांधकामामध्ये तीनच्या ऐवजी चौथा मजला चढवला. यासंदर्भात भ्रष्टाचाराचे पुरावे नव्हते तरीही त्यांना संशयावरूनच संस्थेतून काढून टाकण्यात आले, आता तुमचे (पदाधिकाऱ्यांचे) काय करायचे, असा प्रश्न डॉ. देशपांडे यांनी उपस्थित केल्याची माहिती मिळाली. डॉ. देशपांडे यांच्या वक्तव्याला ज्येष्ठ सदस्य डॉ. सुधीर रसाळ यांनी पाठिंबा दर्शवत, तुमचे (पदाधिकाऱ्यांचे) चुकलेेले आहे. याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी केली. जेव्हा ‘केंद्र कमकुवत होते, तेव्हा अशा वृत्ती सगळीकडून डोके वर काढतात’, असा प्रकार झाला असल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रकारावर सदस्य डॉ. उल्हास शिऊरकर, ॲड. रामेश्वर तोतला आदींनी मत व्यक्त केले. सर्व प्रकारावर संस्थेच्या अध्यक्षांनी चूक झाल्याचे मान्य करीत यापुढे अशी चूक होणार नाही, अशी हमी दिली. या सर्व प्रकारानंतर संस्थेचे सचिव डॉ. उकडगावकर यांनी बैठकीतच संस्थेच्या अध्यक्षांसमोर राजीनामा पत्र ठेवून ते निघून गेले. याच बैठकीत ज्येष्ठ सदस्या डॉ. रश्मी बोरीकर यांनी पदाधिकारी नियामक मंडळाला विश्वासात न घेता निर्णय घेत असल्याचा थेट आरोप केल्याचेही विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. याविषयी डॉ. उकडगावकर यांच्याशी अनेकवेळा संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही.

शाळेचे सुरक्षा डिपॉझिट २० हजारावरून ४० हजार
स.भु. संस्थेच्या इंग्रजी माध्यमाच्या सीबीएसई शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून सुरुवातीला दहा हजार रुपये सुरक्षा डिपॉझिट ठेवण्यात येत होते. त्यात वाढ करून २० हजार करण्यात आले. त्यानंतर ऐन कोरोनाच्या काळात हेच डिपॉझिट ४० हजार रुपये केले. हे करताना त्यास नियामक मंडळाची मान्यता घेण्यात आलेली नसल्याची माहितीही एका ज्येष्ठ सदस्याने नाव छापण्याच्या अटीवर ‘लोकमत’ला दिली.

असा काही प्रकार घडला नाही
संस्थेच्या सचिवांनी राजीनामा दिलेला नाही. असा काही प्रकार घडला नाही. संस्थेच्या नियामक मंडळाच्या सदस्यांनी जर ही माहिती दिलेली असेल तर त्यांच्या नावाने छापा. शेवटी त्यांच्यावर विश्वास ठेवायचा की माझ्यावर हे ठरवा.
- राम भोगले, अध्यक्ष, सरवस्ती भुवन शिक्षण संस्था

Web Title: Saraswati Bhuvan secretary resigns over irregularities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.